
बारामती शहरात पुन्हा चिंता
बारामती : महान्युज लाईव्ह
गेल्या अनेक दिवसापासून कोरोनामुक्त असलेल्या बारामतीमध्ये एका महिला रुग्णाचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, परंतु ही तपासणी खासगी प्रयोगशाळेत झाली असल्याने प्रशासनाने याची सरकारी प्रयोगशाळेत चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानंतरच याविषयी अधिकृत माहिती जाहीर केली जाणार आहे.
बारामती शहर गेल्या अनेक दिवसापासून कोरोनामुक्त असल्याने लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यानंतर अनलॉक च्या पहिल्या टप्प्यात संपूर्ण बारामतीतील दैनंदिन व्यवहार पूर्ववत करण्यात आले आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील सर्व दुकाने व दररोजचे संपूर्ण व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू आहेत. त्यामुळे बारामती शहरात दररोज गजबजलेली गर्दी दिसते. अशा गर्दीतच आज कोरोनाचा एक रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची चर्चा सुरू झाल्याने शहरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या संदर्भात तालुका आरोग्य प्रशासनाकडे पूर्ण माहिती नाही, परंतु या महिला रुग्णाचा खाजगी प्रयोगशाळेतील अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याची सरकारी प्रयोगशाळेत ही तपासणी केली जाणार आहे. या तपासणीनंतर या रुग्ण विषयाचे निष्कर्ष जाहीर केले जातील असे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी सांगितले. संबंधित महिला रुग्ण शहरातील असल्याने ही काळजी अधिक घेतली जात आहे.
दरम्यान बारामतीकरांनी शहरांमध्ये गर्दी न करता फिजिकल डिस्टंसिंग चे नियम पाळावे व लॉकडाऊन चे नियम पाळावेत असे आवाहन प्रशासनाने केले आहे.











