पुणे : महान्युज लाईव्ह
नागपूर नंतर प्रथमच पुणे ग्रामीण पोलिस दलातील महिलांसाठी आठ तास कामाचे आदेश (ड्युटी) देण्यात आले आहेत. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी हे नवे आदेश नुकतेच दिले आहेत.
यापूर्वी नागपूर पोलिस आयुक्तांनी हा प्रयोग प्रायोगिक तत्वावर राबविला होता. राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी महिला पोलिस अंमलदार यांना सहानुभूतीपूर्वक विचार करून आठ तास ड्युटी करण्याचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी मांडला होता. त्याप्रमाणे पुणे ग्रामीण पोलिस दलात ही योजना राबविण्याबाबत सूचित केले होते.
त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी दिनांक १ सप्टेंबर पासूनच ही योजना राबविण्याबाचा निर्णय घेतला असून महिला अंमलदार यांना ८ तास कर्तव्याचे (ड्युटी)देण्याचे आदेश दिले आहेत.
सदर प्रयोग प्रायोगिक तत्वावर राबविला जात असून हा यशस्वी झाल्यानंतर पुरुष अंमलदार यांनाही ८ तास कर्तव्याचे देण्याबाबत विचाराधीन असल्याचे संकेत दिले आहेत. या आदेशाने पुणे ग्रामीण पोलिस अंमलदार यांना आपल्या कुटुंबाकडे वेळ देणे शक्य होणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे.











