आंतरराज्य घरफोडी करणारी टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; शिरूर पोलिस स्टेशन हद्दीतील घरफोडी उघडकीस
शिरूर : महान्युज लाईव्ह
शिरूर शहरात घरफोडी करून फरार झालेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून यातील आरोपींवर इतर राज्यात ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर शहरात दिनांक 16 ऑगस्ट 2021 रोजी आदिनाथ नगर या ठिकाणी संतोष शेवाळे यांचे कुटुंब वैयक्तिक कामानिमित्त त्यांचे राहते घर कुलूप बंद करून बाहेर गेले होते.
या संधीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी दिवसा दुपारचे वेळी शेवाळे यांचे घराचे कुलूप कशाचेतरी सहाय्याने उचकटून घरफोडी चोरी केली होती त्यात एकूण दहा लाख पंधरा हजार रुपयांचे एकोणतीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी गेले होते. याबाबत संगीता संतोष शेवाळे यांनी शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता.
याबाबत घरफोडी चोरीच्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या तपास पथकाने चोरट्यांची माहिती घेत असताना सदरची घरफोडी चोरी ही आंतरराज्यात सक्रिय असलेल्या टोळीने केली असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांना मिळाली होती.
सदरचा गुन्हा किशोर तेजराज वायाळ (रा. मेरा खु ता. चिखली बुलढाणा) याच्या टोळीने केला असल्याची बातमी मिळाल्याने टोळीची माहिती काढत असताना टोळीचा म्होरक्या त्याच्या साथीदारासह शिरूर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचून किशोर तेजराज वायाळ वय 45 वर्षे (रा. मेरा बुद्रुक तालुका चिखली बुलढाणा), गोरख रघुनाथ खांडेकर वय 34 वर्ष (रा. जालना) या दोघांना ताब्यात घेतले.
पोलीसांनी तपास करताना दोघांनी शिरूर येथील घरफोडी चोरीचा गुन्हा केल्याचे कबूल केले. तसेच गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल हा संशयित आरोपी सचिन जगन्नाथ शहाणे वय 35 वर्षे, रा.औरंगाबाद याला मालाची माहिती देऊन त्याचे मालाची विक्री तसेच विल्हेवाट करून घेतली असल्याने त्यास तपास कामी बोलावून घेऊन त्याचा सहभाग आढळून आला.त्या तिघांनाही शिरूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यातील आरोपी किशोर तेजराज वायाळ याने साथीदाराच्या मदतीने नंदुरबार शहर पोलिस स्टेशन, शहादा पोलिस स्टेशन येथे घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत तसेच त्याचेवर यापूर्वी गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र राज्यात घरफोडीचे 50 हुन अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हा तपास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे, सहायक फौजदार तुषार पंधारे, पोलिस हवालदार जनार्धन शेळके, राजु मोमीन, अजित भुजबळ,पोलिस नाईक मंगेश थिगळे, अक्षय जावळे, दगडू वीरकर यांनी केली आहे.
यातील आरोपी नामे किशोर तेजराज वायाळ हा घरफोडी सराईत गुन्हेगार असून तो जेलमध्ये गेल्यानंतर नवीन गुन्हेगारांची ओळख करून घेऊन टोळी तयार करतो टोळीमध्ये त्याला मामा नावाने ओळखतात. किशोर वायाळ चोरीच्या रकमेतून त्याचे राहते गावात सामाजिक कामात हातभार लावून काही गरजूंना मदत करतो आणि स्वतःला गावाचा रॉबिनहूड असल्याचे दाखवतो.
किशोर वायाळ याच्यावर महाराष्ट्रासह गुजरात राज्यातील देखील चोरीचे बरेच गुन्हे दाखल आहेत. तो चोरी करताना घरफोडी करण्याच्या ठिकाणी येण्यासाठी बसचा वापर करायचा. सोबतच्या साथीदारांना मोटारसायकलवर चोरीचे ठिकाणी बोलावून घेऊन त्यानंतर सदर परिसराची ठिकाणांची पाहणी करून तो दहा ते पंधरा मिनिटात चोरी करून घरफोडी करून तेथून पसार व्हायचा.
त्यामुळे त्याची ओळख पटवणे व त्याला अटक करणे हे जिकरीचे व आव्हानात्मक काम होते. त्याने आजवर पाचशेच्या वर चोऱ्या केल्या असून दिवसा घरफोडी ज्या अनेक गुन्ह्यांमध्ये त्याला अटक देखील झालेली आहे. त्याने त्याचे मूळ गावी मेरा बुद्रुक (तालुका चिखली जिल्हा बुलढाणा) येथे स्मशानभूमीसाठी शंकराची मूर्ती, लोकांना बसण्यासाठी बाकडे वगैरे तसेच गावातील तरुण मुलांना तो वारंवार खर्च देखील करत असतो. त्याच्यावर महाराष्ट्रासह इतर राज्यात घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याने व तो पोलिसांना गुंगारा देण्यात पटाईत असल्याने त्या परिसरात रॉबिनहूड किशोर या नावाने परिचित आहे