शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणी ताबडतोब बंद करा… शशिकांत तरंगे
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
शेतकरी हा प्रचंड आर्थिक संकटात आहे. त्यांना आधाराची गरज असताना वीज वितरण कंपनी वीज कनेक्शन च्या नावाखाली त्यांना मानसिक त्रास देत आहे.शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचाच एक प्रकारे प्रयत्न वीज कंपन्यांकडून केला जातोय आणि त्याचा आनंद अधिकाऱ्यांना होतो की काय ? असे गृहीत धरुन या अधिकाऱ्यांचा आनंद अधिक द्विगुणित करण्यासाठी यशवंत प्रहार संघटनेचे अध्यक्ष व युवा नेते डॉ.शशिकांत तरंगे यांच्या नेतृत्वाखाली गांधीगिरीचे अनोखे हत्यार उपसले गेले.
वीज वितरण च्या इंदापूर कार्यालयात डॉ. तरंगे यांनी कार्यकर्त्यांसमवेत जावून अधिका-यांना पेढे वाटून गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले.व शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणी ताबडतोब बंद करावी अशी मागणी केली.
इंदापूर महावितरण केंद्र येथे डॉ. शशिकांत तरंगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणी ताबडतोब बंद करावी यासाठी गांधीगिरी आंदोलन करून निवेदन देण्यात आले. डॉ. तरंगे म्हणाले, महावितरणचे अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे दुःख दिसत नाही. शेतकऱ्यांवर आज उपासमारीची वेळ आली असताना त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होणे व आधार देणे अपेक्षित असताना त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम महावितरण करत आहे.
त्यांच्या कोणत्याही शेतमालाला बाजार भाव मिळत नाही. साखर कारखाने उसाची बिले अदा करत नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हा प्रचंड आर्थिक संकटात असताना, त्यांना आधाराची गरज असताना त्यांना वीज कनेक्शन च्या नावाखाली मानसिक त्रास देऊन आत्महत्या प्रवृत्त करण्याचाच एक प्रकारे प्रयत्न वीज कंपन्यांकडून केला जातोय, असा आरोपही तरंगे यांनी केला आहे.
शेतकऱ्यांना होत असणा-या त्रासाचा आनंद ह्या अधिकाऱ्यांना होतो की काय?असे गृहीत धरून या अधिकाऱ्यांचा आनंद अधिक द्विगुणित करण्यासाठी त्यांना पेढे वाटून गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांची चालू असलेली वीज तोड थांबवावी अन्यथा उग्र स्वरूपा मधील आंदोलन करण्याचा इशारा डॉ. शशिकांत तरंगे यांनी दिला आहे.
यावेळी लक्ष्मण देवकाते, बापूसाहेब पारेकर, सुहास गोटे, संतोष जाधव, शिवराज गावडे, अण्णासाहेब तरंगे, सिताराम जानकर, नितीन गोफणे, दादा माने आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह शेतकरी उपस्थित होते..











