दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील यवत येथे १६ ऑगस्ट रोजी आय़डीबीआय़ बॅंकेच्या एटीएम मशीनची चोरी झाली होती. त्यामध्ये चक्क ११ लाख ५८ हजार रुपयांची रोकड चोरीला गेली होती. पोलिसांना या चोरीचा धडा लावताना कसरत करावी लागली.. पण कानून के हात बहुते लंबे होते है.. या म्हणीचा अजूनही चोरटे का बरे बोध घेत नाहीत?
यवत पोलिसांनी या आयडीबीआय बॅंकेच्या एटीएम चोरीप्रकरणात अजय मारुती चव्हाण (वय २४ वर्षे. रा. उरूळी कांचन, ता. हवेली) व साजन बाळासाहेब भोसेकर (रा. ताम्हणवाडी, ता. दौंड जि. पुणे) या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणातील तिसरा संशयित केतन बाळासाहेब ढवळे (रा. खेडेकर मळा, उरूळी कांचन) हा फरार असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत.
१६ ऑगस्ट रोजी या बॅंकेच्या एटीएममधून ११ लाख ५८ हजार रुपयांची चोरी झाली होती. या प्रकरणी बॅंकेचे व्यवस्थापक आशिषकुमार शर्मा यांनी यवत पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
याचा तपास करताना पोलिसांची संशयाची सुई बॅंकेतील शिपाई असलेल्या साजन भोसेकर याच्याकडे वळली. त्यांनी भोसेकर याची सहज चौकशी केली. तेव्हा तो गडबडला. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीच वाढला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली आणि चोरीचा सारा कट पोलिसांपुढे उघड झाला.
भोसेकर याने एटीएम मशीनच्या पासवर्डची माहिती आरोपींना दिली होती. तांत्रिक बिघाड झाल्याची बतावणी करून त्यांनी एटीएम मशीनचा वीजपुरवठा बंद केला आणि १६ ऑगस्ट रोजी रात्री मशीनमधील ११ लाख ५८ हजार रुपये लंपास केले. त्याची कबुली त्याने देताच पोलिसांनी अजय चव्हाण यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून ७ लाख २३ हजार रुपय पोलिसांनी हस्तगत केले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अशोक शेळके, फौजदार अमोल गोरे, हवालदार विजय कांचन, राजू मोमीन, जनार्दन शेळके, अजय घुले, अजय भुजबळ, मंगेश थिगळे, चंद्रकांत जाधव, मंगेश कदम, बाळासाहेब खडके, सुजाता कदम, पूनम गुंड, धीरज जाधव आदींनी केली.











