suresh misal – mahanews.live
उजनी धरणात कधीकाळी विमान बुडले होते.. त्या घटनेला आता बरीच वर्षे लोटली आहेत.. आता त्याच धरणातून विमाने उड्डाण करतील.. सी प्लेन ची सेवा उजनीच्या कालठण भागातून करण्याचा सरकारचा विचार सुरू असून पर्यटन धोरणाअंतर्गत ही विमानसेवा होणार असल्याचे कळते.
या विमानसेवेमुळे पंढरपूर, सोलापूर, नगर जिल्ह्यासह उस्मानाबाद, तुळजापूर ही ठिकाणे लवकर पोचण्याच्या दृष्टीने सोयीची ठरणार आहेत. कालठण परिसरात उजनीने तळ गाठला तरी पाणी शिल्लक असते, त्यामुळे तेथून सी प्लेनची सेवा वर्षभर सुरू ठेवता येणार आहे.
यासंदर्भात उजनी जलाशय व्यवस्थापनानेही दुजोरा दिला असल्याने आता ही विमानसेवा प्रत्यक्षात किती वर्षांनी सुरू होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मध्यंतरी उजनीतून जहाजसेवा सुरू करण्याचेही ठरले होते. मात्र ते मध्यंतरी बारगळले. ती देखील महत्वाकांक्षी योजना होती.
उजनी धरणातून विमानसेवा करण्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांचा आग्रह होता. त्यानुसार नागरी उ्डडाण विभागाने याची पाहणी केली. इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव, माढा तालुक्याच्या हद्दीत धरणाच्या लगत असलेल्या एका गावाचीही पाहणी करण्यात आली. मात्र कुंभारगावात परदेशी पक्ष्यांचा मोठा मुक्काम व उजनी धरणालगत विमानाची उड्डाणे नको या कारणास्तव तिसरे ठिकाण म्हणून इंदापूर तालुक्यातीलच कालठणला तज्ज्ञांनी पसंती दिल्याचे समजते.











