राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड : शहर पोलीस स्टेशनचा पदभार स्विकारताच पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्यांना टार्गेट केले आहे. आज गुरूवारी मलठण येथील बेकायदा गावठी दारुच्या अड्ड्यावर धाड टाकून दारू अड्डा उध्वस्त केला.
दौंड पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची बदली यवत पोलीस स्टेशनला झाल्याने दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुन्हा अवैध व्यावसायिकांनी आपले व्यवसाय सुरू केले आहेत. मलठण येथील भीमा नदीच्या काठावर गावठी दारु तयार करून त्याची खुलेआम विक्री केली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना मिळाली.
घुगे यांनी तातडीने पोलीसांचे एक पथक कारवाईसाठी तैनात केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, पोलिस हवालदार विनोद चव्हाण, महेंद्र लोहार, नारायण वलेकर, पोलिस नाईक अमोल गवळी, किशोर वाघ, अमोल देवकाते यांच्या पथकाने माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईत पोलीसांनी दारू गाळण्यासाठीचे बॅरल, प्लॅस्टिक बॅरल, १६०० लीटर कच्चे रसायन, १० लीटर हातभट्टी दारू असा जवळपास १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, कारवाईसाठी पोलीस आल्याचे पाहून संबंधित दारू बनवणाऱ्यांनी तेथून पळ काढला. याप्रकरणी दौंड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस हवालदार विनोद चव्हाण करीत आहेत.