राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या थकीत कर्ज आणि भष्ट्राचाराची ईडी मार्फत किंवा कोणतीही शासकीय चौकशी लावा, भीमा पाटस सहकारी कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार स्वर्गीय सुभाष कुल आणि मी उपाध्यक्ष असलेल्या कालावधीतील ही बिनधास्त चौकशी करावी, उलट आमदार राहुल कुल यांची केंद्रात सत्ता आहे.
त्यांनी ईडीची चौकशी लावावी, मी कोणत्याही चौकशीस तयार आहे. मग होऊनच जाऊ द्या; दुध का दुध आणि पाणी का पाणी..! तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी ,सभासद , कामगार आणि ग्रामस्थांसमोर सत्य बाहेर येवू द्या, असे खुल आव्हान पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आणि आमदार राहुल कुल यांना दिले.
दौंड तालुक्यात आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर भिमा पाटस सहकारी कारखान्याच्या मु्द्दावरून पुन्हा एकदा आरोपप्र त्यारोपांनी राजकीय वातावरण तापले आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार थोरात यांनी बुधवारी ( दि.25)
पुण्यात पत्रकार परिषदेत घेतली होती.
या पत्रकार परिषदेत थोरात आणि भीमा पाटस कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार राहुल कुल यांच्या विविध आरोप करीत टिका केली होती. यावेळी जिल्हा बॅकेचे दिडशे कोटी थकीत असून त्यांनी थकबाकीची देणी न दिल्याने कारखान्यावर जप्तीची नोटीस पाठवली आहे. याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.
जिल्हा बॅकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी गुरूवारी ( दि.26) दौंड येथील जिल्हा बॅकेच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी थोरात म्हणाले की, भीमा पाटस कारखान्याला थकीत देणी न दिल्याने पोस्टाद्वारे नोटीस पाठवली होती मात्र त्यांनी ती नोटीस स्विकारली नाही.
बॅंकेचे अधिकारी आणि कर्मचारी हे कारखान्यावर नोटीस बजावण्यास केले असता, कारखान्यावर कोणीही उपस्थित नसल्याने ही नोटीस कारखान्यावर लावण्यात आली आहे. भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याने पुणे जिल्हा बँकेकडून आता पर्यंत विविध स्वरूपात कर्ज घेतले आहे.
सध्या त्यांच्याकडे तब्बल दीडशे कोटी रुपयांचे कर्ज असून त्यांनी ते थकवले आहे. या थकीत कर्जाबाबत बॅंकेने त्यांना वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र दोन वर्ष उलटून ही थकीत देणी न दिल्याने आम्हाला जिल्हा बॅकेचे आणि सभासदांचे हित पाहायाचे आहे. यामुळे कारखान्यास जप्तीची नोटीस पाठवली आहे.
यात कोणतेही राजकारण किंवा राजकीय द्वेषापोटी ही कारवाई केली नाही. असे थोरात यांनी स्पष्ट केले. आमदार राहुल कुल यांचे वडील आणि भीमा पाटस कारखान्याचे माजी अध्यक्ष स्वर्गीय सुभाष कुल हे अध्यक्ष आणि मी उपाध्यक्ष असताना कारखाना अडचणीत नव्हता. कामगारांचे पगार थकले नव्हते.
कर्जांची परत फेड वेळेवर केली जात होती. ऊस उत्पादक सभासदांना वेळेवर ऊसाचे बिल जमा केले जात होते. कारखाना सुऱळीत व व्यवस्थित सुरू होता.कसलीही अडचण नव्हती, मात्र मागील 20 वर्षापासून भीमा पाटसवर आमदार राहुल कुल यांची एक हाती सत्ता आहे. या वीस वर्षात कारखान्याची काय अवस्था झाली हे सभासद पाहात आहेत.
कारखान्यावर विविध बॅंकाचा कोट्यावधी रूपयांचा कर्जाचा डोंगर आहे. हे कर्ज घेताना त्यांनी बॅंकाचीही फसवणुक केली आहे. सभासदांच्या नावावर ट्रॅक्टरवर परस्पर कर्ज काढले आहे, कामगारांचे पगार थकीत आहेत. मध्यतंरी कारखान्याच्या गोडाऊन मधील साखर पोती आगीत जळून खाक झाली. ही आग लागली नाही तर ती लावली गेली होती. कारण गोडाऊन मध्ये विजेची कोणत्याही प्रकारची वायर नाही, मग शाॅर्ट सर्किट झाले कसे? असा प्रश्न थोरात यांनी यावेळी उपस्थित केला.
भीमा पाटस सहकारी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कै. मधुकर काका शितोळे यांनी सन 1980 झाली कारखाना सुरू केला आहे. त्यांनी ही अत्यंत चांगल्या प्रकारे कारखाना चालविला होता. मात्र कुल यांच्यामुळेच हा कारखाना बंद पडला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 36 कोटी रूपये कारखाना सुरू करण्यासाठी घेतले, मग कारखाना का सुरू केला नाही? या 36 कोटी रूपयांचे काय केले याचे उत्तर कुल यांनी द्यावे,
कामगार आणि सभासदांना उपासमारीची वेळ आली असून यास राहुल कुल हेच जबाबदार आहेत. कुल यांनी बिनधास्त चौकशी लावावी, सन 1980 पासून ते आतापर्यंत ईडी मार्फत चौकशी लावावी, मी कोणत्याही चौकशीस समोरे जाण्याची माझी कधीही तयारी आहे. चोर तो चोर आणि वर शिरजोर या म्हणीप्रमाणे कुलांचा कारभार सुरू आहे. अशी टिका थोरात यांनी पत्रकार परिषदेत केली.
शेतकरी सभासदांनी याबाबत सहकार आणि साखर आयुक्त यांच्याकडे तक्रार केली असून कारखान्याची सखोल चौकशी करण्याची लेखी मागणी केली आहे अशी माहिती थोरात यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष अॅड,अजित बलदोटा यावेळी उपस्थित होते.











