‘निसर्ग’ बधितांना जास्तीत जास्त मदत देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : महान्यूज लाईव्ह
‘निसर्ग’ चक्रीवादळात पुणे जिल्ह्यात प्राथमिक अंदाजानुसार ८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून ३७१ गावांमधील २८ हजार ४९६ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात आज पुण्यात जझालेल्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनास या शेती व शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देता यावी यासाठी त्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल तातडीने द्यावा असे आदेश दिले असून या निसर्ग बाधितांना जास्तीत जास्त मदत देण्याचे संकेत पवार यांनी दिले आहेत.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक झाली. या बैठकीस कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते-पाटील, आमदार अशोक पवार, आमदार सुनील शेळके, आमदार अतुल बेनके, आमदार संग्राम थोपटे आदी लोकप्रतिनिधी व विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, कृषी आयुक्त सुहास दिवसे,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपवन संरक्षक ए. श्रीलक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण,
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींच्या सूचना ऐकून घेतल्यानंतर मंत्रीमंडळ बैठकीत याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल असे सांगितले. पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा तात्काळ सुरू करणे, वीजेचे खांब उभे करणे, आदिवासी-बिगर आदिवासी भागातील लोकांना तातडीने मदत देणे, घर, शाळा व अंगणवाडी दुरूस्तीची कामे तातडीने सुरू करणे यासंदर्भात त्यांनी निर्देश दिले. सर्वात महत्वाची बाब म्हणजे नुकसानभरपाईबाबत १३ मे २०१५ च्या शासन निर्णयानुसार देण्यात येत असलेल्या मदतीच्या रकमेत वाढ करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे संकेत पवार यांनी दिले.
कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आदिवासी भागातील बाळहिरड्याचे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगितले. आदिवासी भागातील हे प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. बाळहिरड्याचे प्रति किलो २४० रूपये इतका भाव आहे. या आदिवासी भागातील शेतकऱ्यांना वेगळा मापदंड लावून नुकसान भरपाई देण्याचा विचार व्हावा. आदिवासी भागात घरांचेही मोठे नुकसान झाले, त्यासाठी तातडीने मदत व्हावी, असेही ते म्हणाले.











