ऊद्योगांना नाईलाजाने टॅकरद्वारे पाणी विकत घ्यावं लागत असल्याचा उद्योजकांचा आरोप
बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती औद्योगिक वसाहतीतील जी विभागात पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याबाबत उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली असून नाईलाजाने पाणी विकत घ्यावे लागत असल्याने उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यानबारामती मधील ऊद्योगांना त्वरित नियमित व पुरेसा पाणीपुरवठा झालाच पाहिजे अन्यथा उद्योजक कायदेशीर मार्गाने आंदोलन करतील असा इशारा बारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी औद्योगिक महामंडळाच्या प्रशासनाला दिला.
बारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, उपाध्यक्ष शरद सुर्यवंशी, सचिव अनंत अवचट, खजिनदार राधेश्याम सोनार, सदस्य मनोहर गावडे, महादेव गायकवाड, संभाजी माने, अॅड. शेख, चारूशिला धुमाळ, हरिष कुंभरकर, धनंजय धुमाळ आदींनी औद्योगिक वसाहतीचे बारामती विभागाचे कार्यकारी अभियंता संजय जोशी यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. उजनी जलाशयात यावेळी पुरेसा पाणीपुरवठा असतानाही केवळ हलगर्जीपणा मुळे औद्योगिक वसाहतीचे प्रशासन ऊद्योगांना पाणी पुरवत नाही असा उद्योजकांचा आरोप आहे. उद्योजक पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार संपर्क साधून तक्रारी करत आहेत, परंतु संबंधित अधिकारी प्रतिसाद देत नाहीत असा उद्योजकांचा अनुभव आहे. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात ऊद्योग प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले असताना आता पाण्यामुळे त्यांचा आर्थिक तोटा होत आहे. मोठी किंमत मोजून पाणी टॅकर द्वारे विकत घ्यावे लागत असलेने ऊद्योजक मेटाकुटीस आले आहेत.
दरम्यान उजनी जलाशयातून बारामती औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरीचे खोल नदीपात्रात नुकतेच स्थलांतर करण्यात आले असून त्याची चाचणी चालू आहे. नविन विहीर व पंप व्यवस्थित कार्यान्वित होताच बारामती एमआयडीसीतील विस्कळीत पाणीपुरवठा नियमित होईल असे आश्वासन जोशी यांनी दिले.
दुसरीकडे यासंदर्भात बारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार असलेची माहिती अध्यक्ष धनंजय जामदार यांनी दिली.











