मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्यातील बैलगाडी शर्यती बाबत महिन्याभरात मार्ग काढून अन्यथा गरज भासल्यास नवीन कायदा करू अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे
मंत्रालयात आज या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैलगाडा शर्यत सुरू करण्यासंदर्भात ही बैठक सुरू होती. या बैठकीस गृह राज्यमंत्री बंटी पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे, पारनेरचे आमदार निलेश लंके, किसन कथोरे, खानापूरचे आमदार अनिल बाबर, संजय जगताप, संग्राम जगताप, भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्यासह राज्यातील बैलगाडा मालक आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सुनील केदार यांनी यावेळी सर्व राज्यातील बैलगाडा मालकांशी संवाद साधला. त्यांची मते जाणून घेतली. यानंतर त्यांनी वरील सरकारची भूमिका स्पष्ट केली.
केदार म्हणाले, राज्यातील खिल्लार जातीचे बैल नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या जातीचे संवर्धन होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याची आवश्यकता आहे. सरकारचे उपक्रम राबवत आहे. मात्र बैलगाडा शर्यतीचाही अभ्यास यामध्ये करण्यात येईल. देशी जनावरांच्या संगोपनासाठी प्राधान्य देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासंदर्भात न्यायालयात बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी वरिष्ठ कायदा सल्लागारांची देखील मदत घेतली जाईल.
जयंत पाटील यांनी देखील यावेळी मत व्यक्त करताना राज्यातील बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रयत्न करत असून राज्य सरकार देखील याबाबत सकारात्मक आहे आणि विधानसभेचे सर्व आमदार यासाठी सकारात्मक आहेत असे स्पष्ट केले.
सतेज पाटील यांनी हे सरकार शेतकऱ्यांचे आहे आणि बैलगाड्यांची शर्यत हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे बैलांचा सराव सुरू करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांच्या तात्काळ बैठक बोलावून दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल असे स्पष्ट केले.











