मुंबई : महान्यूज लाईव्ह
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीसाठी वेळोवेळी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबईच्या महापौरपदाचा दावेदार कोण असावा यासंदर्भातील अहवाल काँग्रेसच्या स्ट्रेटजी कमिटीने दिला आहे. कमिटीचे सचिव गणेश यादव यांनी महापौरपदासाठी रितेश देशमुख, सोनू सूद किंवा मिलिंद सोमण यांच्या नावाचा विचार करण्यात यावा असा अहवाल दिला आहे.
विशेष बाब म्हणजे, या स्ट्रॅटेजी कमिटीत एच.के पाटील, अशोक चव्हाण, नाना पटोले, भाई जगताप, अस्लम शेख, वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरे, विरोधी पक्ष नेते रवी राजा हे सर्व नेते आहेत. सगळीकडेच या अहवालाबाबत सध्या चर्चा सुरू आहे.
काँग्रेसला स्बळावर उभारी देण्यासाठी नेत्यांची नाही, तर अभिनेत्यांची गरज आहे का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. काँग्रेसची मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत होणारी मतांची घसरण याबाबतची आकडेवारी या अहवालात दिली आहे.
ही घसरण थांबवायची असेल तर, तरुणांशी आणि सामान्य लोकांशी थेट संपर्क असलेली व्यक्ती महापौर पदाची उमेदवार असावी असे नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल स्ट्रॅटजी कमिटीसमोर ठेवल्यानंतर काँग्रेस पक्षातील इतर नेते काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.











