रत्नागिरी : महान्यूज लाईव्ह
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज सकाळी नाशिक मधील पोलीस पथक ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले असतानाच, आज दुपारी महाड पोलिसांनी राणे यांना संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथे ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली असून, त्यांच्या आरोग्याच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे एक पथक देखील दाखल झाले आहे.
नारायण राणे यांनी काल केलेल्या वक्तव्यानंतर नाशिक पुणे आणि रत्नागिरी येथे गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर राज्यात विविध ठिकाणी राणे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी आंदोलन सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी रत्नागिरी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो दुपारी फेटाळण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली वाजवली असती असे वक्तव्य केल्यानंतर ठिकाणी त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान आज सकाळी महाजनादेश यात्रेचा निमित्ताने संगमेश्वर तालुक्यात राणे आले असतानाच त्यांना अटक होईल असा त्यांचा अंदाज होता.
मात्र तोपर्यंत त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर राणे यांना अटक करण्यात आली. दरम्यान राणे यांच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात अपील अर्ज करण्यात आला, मात्र उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राणे यांच्याकडे दुसरा पर्याय उरला नाही.











