बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती, दि. २२ :- गोखळी (ता. इंदापूर) येथील शेतकरी शिवाजी कृष्णा चितळकर यांचे थकबाकीसाठी १८ ऑगस्ट रोजी तोडलेले वीज कनेक्शन त्यांनी थकबाकी भरताच २० ऑगस्ट रोजीच जोडून दिले होते. मात्र, खातरजमा करण्यापूर्वी त्यांनी झगडेवाडी येथील कार्यक्रमात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात महावितरणने स्पष्टीकरण दिले आहे.
शेतकरी शिवाजी चितळकर यांनी काल (ता.२१) खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कार्यक्रमात कार्यक्रम संपल्यानंतर वीजबिलावरून आत्महत्या करण्याचा इशारा दिला व प्रयत्नही केला होता. यासंदर्भात राज्यात चर्चा झाल्यानंतर, आज महावितरणने या संदर्भातील स्पष्टीकरण दिले आहे.
चितळकर यांनी कनेक्शन जोडल्यानंतरही व त्यांना माहिती दिल्यानंतरही त्यांनी हे कृत्य केल्याचे महावितरणच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
आज महावितरणने दिलेल्या माहितीनुसार चितळकर यांना उच्चदाब वितरण प्रणाली (HVDS) योजनेतून १६ केव्हीए क्षमतेचे स्वतंत्र रोहित्र दिलेले आहे. त्यावर त्यांना ३ अश्वशक्ती क्षमतेचे कनेक्शन दीड वर्षांपूर्वी दिले असून त्यांचा ग्राहक क्र. १८७१८०००२६२९ असा आहे.
बारामती परिमंडलात शेतीसह सर्वच वर्गवारीतील थकबाकीची वसूली मोहीम जोरात सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून १८ तारखेला शिवाजी चितळकर यांचा वीजपुरवठा २७४० रुपये थकबाकीपोटी खंडित करण्यात आला. वीजपुरवठा खंडित करताच दुसऱ्या दिवशी चितळकर यांनी बील भरले.
त्यामुळे त्यांचा वीजपुरवठा २० ऑगस्टला पूर्ववत करण्यात आला. ते शुक्रवारी सकाळी इंदापूर ग्रामीण शाखेत आले होते तेंव्हा त्यांना याची कल्पना दिली होती. असे असताना त्यांनी कोणतीही खातरजमा न करता आंदोलन केल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. तसेच आंदोलनस्थळी स्थानिक अभियंत्यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनाही याची माहिती दिली होती.
दरम्यान या संदर्भात चितळकर यांच्याशी बोलणे होऊ शकले नाही, मात्र काल त्यांनी याच बिलावरून महावितरण वर तोंडसुख घेतले होते.