माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर, दि. १९ – गुंजवणी प्रकल्पाला मंजुरी युतीच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. तसेच या प्रकल्पाला लागणारा सर्व निधी भाजप केंद्र सरकारने दिला असून वांगणी, वाजेघर आणि शिवगंगा खोऱ्यात पाणी मिळण्यासाठी भाजपच्या वतीने प्रयत्न केले होते. गुंजवणी प्रकल्पाचे काम भाजप सरकारमुळेच झाले असल्याने याचे श्रेय महाविकास आघाडी सरकारने घेऊ नये असा इशारा भोर तालुका भाजपने दिला आहे.
गुंजवणी प्रकल्पाच्या कामाचे महाविकास आघाडी श्रेय घेत असल्याबाबत भोर तालुका भाजपच्या वतीने केळवडे ( ता. भोर ) येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी भाजपचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बाळासाहेब गरुड, भोर तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, माजी अध्यक्ष विश्वास ननावरे, पुणे जिल्हा सचिव अशोक पांगारे, कार्याध्यक्ष राजेंद्र मोरे, उपाध्यक्ष विजय चौधरी, विद्यार्थी आघाडीचे निलेश कोंडे, निलेश पांगारे, अभिजित कोंडे आदी उपस्थित होते.
केंद्रातील भारतीय जनता पार्टी सरकारने २०१७ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना केंद्राने या प्रकल्पासाठी १ हजार २३५ कोटीची तरदुत केली होती. या प्रकल्पाला फडणवीस सरकारने १९ मार्च २०१८ साली तात्विक मान्यता दिली होती.
गुंजवणी प्रकल्पासाठी सर्वात जास्त मदत आणि निधीची तरतूद ही भारतीय जनता पार्टी केंद्र सरकारने केली असून यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. स्थानिक शेतकऱ्यांना गुंजवणीचे हक्काचे पाणी मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टीने पाठपुरावा केला असल्याचाही दावा यावेळी उपस्थित भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
जीवन कोंडे यांनी माहिती देताना सांगितले की, भोर, वेल्हा, पुरंदर आणि शिवगंगा खोरे येथील कोरडवाहू जमीन ही ओलिताखाली येण्यासाठी भोर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा केला. जलसपंदा खाते राष्ट्रवादीकडे असताना देखील त्यांनी गुंजवणीचा प्रकल्प १५ वर्ष अपूर्ण का ठेवला?
शिवसेनेचे तत्कालीन जलसपंदा राज्यमंत्री हे गुंजवणीचे पाणी पुरंदरला चुकीच्या पद्धतीने नेत होते. वांगणी, वाजेघर, आणि शिवगंगा खोरे हा भाग वंचित राहणार होता. यासाठी सर्वपक्षीय गुंजवणी संघर्ष समिती स्थापन केल्याने या तिन्ही खोऱ्याना लाभ मिळत असल्याचे जीवन कोंडे यांनी सांगितले.