पुणे : महान्यूज लाईव्ह
एकीकडे अफगाणिस्तान पासून ते संसदेपर्यंत वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत असताना विद्येच्या माहेरघरातील एका घडामोडीने अवघ्या देशाचे लक्ष वेधले. पुण्याच्या विद्येच्या माहेरघरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर मोदीभक्ताने उभे केले.
साहजिकच या अघटीत घटनेची चर्चा झाली. मग टिकेला सुरवात होताच हे मंदीर झाकले गेले. मग रातोरात त्यामधील मोदींचा पुतळाही हलवला गेला.. मग आज राष्ट्रवादीच्या वतीने मंदिरातील देव पुन्हा माघारी बोलवण्यासाठी आरती करण्यात आली.
औंध येथील भाजपचे पदाधिकारी असलेल्या मयूर मुंडे यांनी मोदींचे मंदिर पुण्यात उभारले होते. त्याची वेगवेगळी चर्चा लगेचच सुरू झाली. या मंदिरासाठी मुंडे यांनी दीड ते दोन लाख रुपये खर्च केला होता व हे मंदिर पाहण्यासाठी लोकांची गर्दीही सुरू झाली होती. लोक सेल्फी काढू लागले. मात्र मोदींना देवाचे स्वरुप दिल्यावरून परिसरात उलटसुलट चर्चा सुरू झाली.
त्याची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने देखील घेतली. शहराध्यक्षांनी याच्याशी भाजपचा कसलाही संबंध नसल्याचे लागलीच स्पष्ट केले. मग बुधवारी रात्री मोदींचा पुतळा हटवला गेला आणि मंदिर झाकण्यात आले.
दरम्यान राष्ट्रवादीने या मंदिराला झाकल्यानंतर लागलीच तेथे उपहासात्मक आंदोलन केले. याच मंदिराच्या जागेवर महाआरती करून मंदिरातील देव येथे निश्चित प्रकट होईल आणि पुण्याचे सारे प्रश्न सोडवेल असा आशावाद जागविला.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पुण्यातील महागाई तसेच कचरा, पाण्याच्या समस्या नरेंद्र मोदी या देवामुळे सुटतील असे वातावरण तयार झाले होते, मात्र अचानक देव गायब झाला, मग जगातील सारे प्रश्न सोडविणाऱ्या देवाला पुण्यातील प्रश्नाने सळो की पळो केले की काय? पण मंदिराचा पडदा उघडल्यानंतर मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असा आवाज ऐकू आला आहे, त्यामुळे देव नक्की येईल, यावर विश्वास ठेवा अशी तिरकस टिका केली.
दरम्यान तोंडावर असलेल्या महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्याचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्नही राष्ट्रवादीने केला. गेल्या साडेचार वर्षात भाजपला न सोडवता आलेले पुण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी मोदींना देव अवतार घ्यावाच लागणार होता. मात्र भाजपने पुणेकरांना फसवले अशी टिका जगताप .यांनी केली.
दुसरीकडे ज्येष्ठ नागरीक श्री. नायडू यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या या मंदिराला पुन्हा झाकण्याच्या घटनेबाबत खुद्द मुंडे यांनीच स्पष्टीकरण देत हा पुतळा कार्यालयात नेऊन ठेवला असून विरोधकांची टिका व पंतप्रधान कार्यालयानेही दखल घेतल्याने हे मंदीर झाकण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.