सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
राज्यातील हिवताप निर्मूलन अभियानाअंतर्गत 50 टक्के फवारणी संवर्गातून सध्याची भरती सुरू आहे. त्या भरतीची पाळेमुळे महाघोटाळ्यापर्यंत पोचली आहेत. इंदापूर तालुक्यात एकाच वेळी 57 जण उत्तीर्ण झाल्याने फवारणी संवर्गासाठी प्रमाणपत्रे देण्याचा घोटाळ्याचा संशय वाढला आहे. (# health #workers # Maharashtra #govt)
राज्यात मागील वर्षी जाहीर झालेल्या हिवताप अधिकारी कार्यालय पदभरतीच्या परीक्षेचा निकाल नुकताच 18 जुलै रोजी जाहीर झाला. यामध्ये फवारणी कर्मचारी संवर्गातून मुलींची देखील नावे उत्तीर्णांमध्ये समाविष्ट झाल्याने सार्यांच्या नजरा वळल्या आहेत; तर दुसरीकडे राज्यातील एका तालुक्यात म्हणजे इंदापूर तालुक्यात या परीक्षेतून 57 जण उत्तीर्ण झाले आहेत.
यासंदर्भात ‘महान्यूज’ने कालच वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत राज्यातील आरोग्य भरतीची चौकशीची चक्रे वेगाने फिरली आहेत. पुणे विभागातील सन 2006 पासून म्हणजे जेव्हापासून फवारणीची प्रक्रिया बंद झाली, तेव्हापासून जे जे कर्मचारी आरोग्य सेवक म्हणून भरती झाले आहेत त्या सर्वांची कागदपत्रांची पडताळणी केली जाणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.