इस्त्रोकडून शारदाबाई पवार महिला महाविदयालयास सेंटर म्हणून मान्यता
बारामती : महान्यूज लाईव्ह
गेली पंचवीस वर्षे शिक्षण क्षेत्रात सातत्याने नवनवे प्रयोग करून शिक्षणाची दशा आणि दिशा विधायक दिशेने नेणाऱ्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने आज पुन्हा एक नवी भरारी घेतली. संस्थेच्या शारदाबाई पवार महिला महाविद्यालय आता इस्त्रो चे ऑनलाईन अभ्यासक्रमाचे मान्यताप्राप्त सेंटर असणार आहे.
डेहराडून येथील इस्त्रो संस्था देशभरात कौशल्यावर आधारीत रोजगाारभिमुख ऑनलाईन अभ्यासक्रम सध्या राबवित आहे. यासाठी काही मान्य़ताप्राप्त केंद्रे कार्यरत करण्यात आली आहेत. यामध्ये शारदानगरचा समावेश आहे. आता यापुढील काळात शारदानगरमध्ये माहिती तंत्रज्ञानासह आरोग्य, कृषी आणि आपत्ती व्यवस्थापनावरही इस्त्रोकडून ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जे. साठे, उपप्राचार्य प्रा. रा. बा. देशमुख, प्रा. ए. एस. कदम व या कोर्सचे समन्वयक प्रा. मनोज निंबाळकर यांनी या अभ्यासक्रमाचे स्वरुप स्पष्ट केले. इस्त्रो सध्या वेबिनारच्या माध्यमातून विविध विषय शिकवत आहे. हे विषय शिकण्यासाठी विशिष्ठ अशी अट नाही. महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, प्रशासकीय अधिकारी आणि व्यावसायिक देखील या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेऊ शकतील. हा सर्व अभ्यासक्रम ई – लर्निंगच्या माध्यमातून ऑनलाईन शिकविला जाणार आहे. १ तासापासून ३० दिवसांपर्यंतच्या कार्यशाळा अर्थात वेबिनारचा यामध्ये समावेश आहे. यामधील बहुतेक कोर्स हे प्रमाणपत्राचे कोर्स आहेत. या कोर्सला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी शारदानगर हे सेंटर म्हणून निवडायचे आहे.
महाविद्यालयास ही मान्यता मिळाल्याबद्दल अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, सचिव सौ. सुनंदा पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलावडे यांनी कौतुक केले.










