राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी माझी शेती माझा सातबारा.. मीच नोंदवणार माझा पीकपेरा.. योजनेची बुलढाणा जिल्ह्यातील लोणारमध्ये सुरवात
संदीप मापारी पाटील, बुलढाणा
राज्य शासनाने शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे ठरवले आहे, त्यातंर्गत ई-पीक पाहणी प्रकल्पाचा महत्वाकांक्षी प्रकल्प साकारला असून १३ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सुरवात केल्यानंतर आज प्रत्यक्षात बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात पीकपेरा नोंदविण्याच्या मोहिमेस सुरवात झाली.
बुलढाण्याचे जिल्हाधिकारी, मेहकरचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लोणारचे तहसीलदार सैफन नदाफ यांनी या मोहिमेस सुरवात केली. नदाफ यांनी लोणार तालुक्यातील प्रगतशील शेतकरी प्रकाश मापारी यांच्या शेतापासून या मोहिमेची सुरवात केली.
मापारी यांच्या मोबाईलवरून पीक पेऱ्याची माहिती, मोबाईलवरुन पीक पेऱ्याची माहिती, जलसिंचनाच्या साधनाची माहिती ऑनलाईन ॲपवर कशी भरायची व पिकाचे फोटो कसे अपलोड करावयाचे याचे मार्गदर्शन स्वत: तहसीलदार सैपन नदाफ यांनी केले व मापारी यांचा पीक पेरा प्रत्यक्ष शेतात भरुन घेतला.
लोणार तालुक्यातील सर्वच गावामध्ये ई- पीक पाहणीची सुरुवात झाली असून आज स्वत: तहसिलदार यांनी लोणार भाग -2 सज्जातील प्रकाश आश्रुजी मापारी व रामदास त्रंबक कापुरे यांचे बांधावर जाऊन ऑनलाईन पीक पेरा भरण्याचे मार्गदर्शन केले.
यावेळी मंडल अधिकारी श्री. खोकले, श्री. डव्हळे, श्री. केंद्रे व तलाठी श्री. सौदर, श्री. शेवाळे, कृषी पर्यवेक्षक श्री. विलास जाधव, शेतकरी श्री.सतीश कापुरे उपस्थित होते.
सैफन नदाफ, तहसीलदार – ई- पीक पाहणी प्रकल्प हा शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प असुन यामध्ये शेतकरी त्यांच्या मोबाईल ॲपमधुन आपल्या पीक पेऱ्याची माहिती जलसिंचनाची साधने, पीकाची परिस्थीती,बांधावरील झाडे इत्यादी नोंदी स्वत: घेउन त्यांचे छायाचित्र अपलोड करु शकतात व संबधित तलाठी यांचे लॉगीन वरुन त्याला मान्यता मिळाल्या नंतर सदर माहिती वेबसाईटवर अदयावत करण्यात येते.
सदर ॲप हा हाताळण्यासाठी अत्यंत सोपा असुन ॲड्राईड फोनवरुन मराठी भाषेमधुन माहिती भरता येते व एका मोबाईल क्रमांकावरुन 10 शेतकऱ्यांची माहिती अदयावत करता येते. सदर ॲप हा गुगल प्ले स्टोअर वर “ ई- पीक पाहणी “ या नावाने सर्वांसाठी निशुल्क उपलब्ध असुन तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पीक पेऱ्याची माहिती अद्ययावत करावी.