सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
पुणे सोलापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही कुल्फी साठी प्रसिद्ध असणाऱ्या इंदापूरच्या शिंदे मामा कुल्फी फॅक्टरीला आज दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
या आगीमध्ये कुल्फी फॅक्टरी सह दोन पिकअप वाहने भस्मसात झाली असून या आगीच्या लपेट्याने शेजारी असणारे किराणा दुकान व पीठ गिरणी यांनाही घेरले. यामध्ये पिठाची गिरणी तसेच किराणा दुकानातील धान्य व माल जळून खाक झाला.
दरम्यान आग लागल्याचे समजताच त्या ठिकाणी इंदापूर नगरपरिषेची अग्निशमन गाडी दाखल झाली. अग्निशमन जवानांनी आग विझवण्याचे काम शर्तीने केले आहे.सदरील आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती असून आग कोणत्या कारणाने लागली हे अद्याप अस्पष्ट आहे.
आज दुपारी शिंदे मामा कुल्फी फॅक्टरीला आग लागल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखविल्याने तात्काळ अग्निशमन दल दाखल झाल्याने मोठी हानी टळली आहे. आजच्या आगीमध्ये जीवितहानी झाली नाही.