शहरातील तुकाईनगर भागातील ज्येष्ठ महिलेचा पुण्यात मृत्यू
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंडमधील ज्येष्ठ महिलेचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे कोरोनामुळे बळी गेलेल्यांची दौंडमधील संख्या तीन वर पोचली आहे.
शहरातील तुकाईनगर भागातील ६० वर्षीय ज्येष्ठ महिलेला घशातील खवखव व ताप- खोकल्याचा त्रास सुरू झाल्याने तिला दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिला फरक पडत नसल्याने तिला पुण्यात उपचारासाठी पाठविण्यात आले होते. तिथे कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये या महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. आज (ता.२) पहाटे पुण्यात या महिलेचा मृत्यू झाला. दौंडमधील कोरोनाने झालेला हा तिसरा मृत्यू आहे.
आज दौंडमधील कोरोनाबाधितांच्या संपर्कातील सात जण कोरोना निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला असतानाच या महिलेच्या मृत्यूने व ती कोरोनाबाधित असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे आणि शहरात वेगवेगळ्या भागात हळूहळू कोरोनाचे रुग्ण दिसू लागल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.










