दौंड : महान्यूज लाईव्ह
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस जवळ भागवतवाडी येथे भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने महामार्गालगत मेंढपाळ युवतीला जोरदार धडक दिली. या अपघातात ही युवती जागीच ठार झाली.
चारचाकी वाहनामधील तीन जणांना मार लागल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत ही माहिती पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी दिली. सुमन विठ्ठल पडळकर (वय १७, रा गिरीम ता दौंड जि पुणे) असे या अपघातात मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे.
शनिवारी (दि.१४) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पाटस हद्दीतील भागवतवाडी जवळ हा अपघात झाला. दौंड तालुक्यातील गिरीम येथील पडळकर कुटुंब पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत भागवतवाडी येथे रात्री मुक्कामाला थांबले होते.
शनिवारी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत सुमन पडळकर ही मेंढ्या चारत असताना पुणे बाजुंकडून पाटस कडे भरधाव वेगाने जात असलेल्या चारचाकी शेवरलेट कंपनीची क्रुस कार ( क्रमांक MH 14 CC 8625 ) वाहनांच्या स्टेअरींग मध्ये बिघाड झाल्याने वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि महामार्गालगत असलेल्या सुमन हिला जोरदार धडक देऊन अपघात केला.
अपघातात सुमन हिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ती जागीच ठार झाली. तर अपघातातील चार चाकी वाहन धडक देऊन दोनशे फूट अंतरावर जाऊन पलटी झाली. या वाहनांमधील तीन प्रवाशांना ही मार लागल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, सहाय्यक फौजदार सागर चव्हाण, पोलीस नाईक घनश्याम चव्हाण, पोलीस शिपाई समीर भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान संभाजी सोमा पडळकर यांनी पाटस पोलिस चौकीत फिर्याद दिल्याने वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.