दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
पोलिस निरिक्षक आनंदराव खोबरे यांनी वाई पोलिस ठाण्यात सात महिन्यापुर्वी सहाय्यक
फौजदार विजय शिर्के, किरण निंबाळकर, सोमनाथ बल्लाळ, महिला पोलिस सोनाली माने या चार जणांना सोबत घेऊन डिबी पथक तयार केले. सात महिन्यात या पथकाने अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणले. तसेच वाई शहरासह हद्दीतील गावांमधील अवैध धंद्यावर धाडी टाकून बंद केले. अनेक चोरीचे गुन्हे अवघ्या २४ तासात उघडकीस आणुन गुन्हेगारांना गजाआड करण्यास हे पथक यशस्वी झाले.
वाई पोलिस ठाण्यातील डिबी पथकाने चमकदार केलेल्या कामगीरीमुळे सातारा पोलिस दलाची उंची आणि समाजात विश्वासार्हता वाढविण्यासाठी केलेल्या कामाची दखल घेऊन पोलिस निरिक्षक आनंदराव खोबरे, पथकातील पोलिस उपनिरीक्षक संजय मोतेवार, सहाय्यक फौजदार विजय शिर्के, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, सोमनाथ बल्लाळ, महिला पोलिस सोनाली माने यांचा १३ ऑगस्ट रोजी सातारा येथे झालेल्या क्राईम मिटींगमध्ये जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बंसल यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे कि ३० मे रोजी किसनवीर कॉलेज परिसरातील हॉटेल सनई शेजारी तक्रारदार यांचे मंडप साहित्याचे गोडावुन आहे. त्या ठिकाणी मिनी ट्रक व त्यावर पाच लाख रुपये किमतीचा एक जनरेटर असा उभा असताना त्या मध्य रात्री अज्ञात चोरट्यांनी डुप्लीकेट चावीचा वापर करुन जनरेटरसह मालट्रक लंपास केला होता.
याची तक्रार वाई पोलिस ठाण्यात दाखल झाली. चोरीचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी तात्काळ हा गुन्हा तातडीने उघडकीस आणण्यासाठी डिबी पथकाकडे सुपूर्त केला.
या पथकाने तपास गतीमान करण्यासाठी व आरोपीपर्यंत पोहचण्यासाठी मंडप कॉंट्रेक्टर बनून वाई सुरूर, वेळे, शिरवळ, खंडाळा, जोशीविहीर, पाचवड, आनेवाडी टोलनाका येथील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करीत करीत आरोपीचा माग काढला.
हे पथक एक हजार कि.मी.चे अंतर कापत नगर जिल्ह्यात पोहचले. तेथील मंडप कॉट्रेक्टर पर्यंत पोहचून जुना जनरेटर विकत घ्यायचा आहे असे सांगून हे पथक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत
आरोपी पर्यंत पोहोचले.
मीनीट्रकसह आरोपी ताब्यात घेण्यास अखेर यश आले. हाच गुन्हा अवघ्या २४ तासात उघडकीस आणल्यानेच पथकाला शाबासकीची थाप म्हणून जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बंसल यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देऊन गौरव करण्यात आला .