संपादकीय
कोरोनायुक्त हा शब्द अनेकांना सहन होणार नाही हे माहिती आहे. पण पाचवा लॉकडाऊन आपण ज्याला म्हणतो आहोत, तो लॉकडाऊन नाही, तो अनलॉक ची पहिली पायरी आहे. फक्त हॉटेल, शाळा, थिएटर एवढे मोजके अपवाद वगळता सरकारने सारे काही चालू केले आहे, तेव्हा आता कोरोनाचे रूग्ण धडाधड वाढत असतानाही सरकारने हे का सुरू केले? याचा विचार करावा लागेल. बहुतेक वेळा सरकारी यंत्रणांनी, जबाबदार धोरणकर्त्या राज्यकर्त्यांनी, लोकप्रतिनिधींनी देखील कोरोनाबरोबर राहायचेय अशी हाकाटी दिलेली आहे. त्यावेळी कोणाच्याही लक्षात आलेले नाही की, आपले राज्यकर्ते बाहेर वातावरणात कोरोना फिरत असताना अशी रिस्क का घेत आहेत? माध्यमांनी दाखवले आणि आपण ऐकले अशीच सध्या आपली स्थिती आहे.
अर्थात या निर्णयावर, धोरणावर कोणतीही टिका ना सामाजिक माध्यमे करीत आहेत, ना विरोधक! का बरे ते टिका करीत नसावेत? त्य़ाचे कारण देशातील, राज्यातील, जिल्ह्यां-जिल्ह्यांतील एवढेच काय अगदी गावातील ठप्प पडलेले व्यवहार त्यांच्या नजरेत आले आहेत. जिवाच्या भीतीने जनता बोलत नसली तरी जनतेचे जे हाल होत आहेत, त्याचा विचार बहुधा त्यांनी केला असावा किंवा प्रत्येक गोष्टीला नाट्यमय वळण देण्याच्या कृतीत शहाणपणा नाही हे तरी धोरणकर्त्यांना पटले असावे.
काहीही असले तरी आता कोरोना असताना, उलट धुमाकूळ घालत असताना वातावरण मोकळे केले आहे, म्हणजे धोका आहेच. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा ७० हजारांची संख्या ओलांडून पुढे गेला आहे, त्यापैकी ३० हजार १०८ रुग्ण बरे झाले आहेत. २३६२ जण आजपर्यंत अगदी आज ( ता.२) दुपारपर्यंत मृत्यूमुखी पडले आहेत. थोडक्यात राज्यात अजूनही ४० हजार कोरोनाचे रुग्ण आहेत आणि उपचार घेत आहेत. त्यापैकी काही लक्षणांचे काही बिगर लक्षणे असलेले आहेत.
आता मुद्दा आहे तो, कोरोनायुक्त होण्याचा…हे वाक्य वापरले तरी टिका होणार हे निश्चित..मात्र हीच आताची पुढील जगण्याची शैली असणार आहे हेही वास्तव आहे..निश्चितच कोरोनासह जगावे लागणार आहे. कोरोना घरात येणार नाही याची काळजी तर घ्यावी लागेल, मात्र कामाच्या घाईगडबडीत तो घरात येणारच नाही याचीही काही शाश्वती राहणार नाही. फक्त एक गोष्ट पक्की झाली आहे, ती म्हणजे फक्त कोरोना तुम्हाला मारणार नाही. एकट्या कोरोनामुळे कोणी मरणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक वैद्यकीय तज्ज्ञांच्या बोलण्यातून, जे उपचार करीत आहेत, त्यांच्या सांगण्यातील निष्कर्ष पुढे येत आहेत की, कोरोना तेवढा घातक राहीलेला नाही, जेवढा सुरवातीला होता. तो बराचसा म्युटेट झाला आहे. त्यामुळे ६० वर्षावरील व १० वर्षांखालील मुले, वृध्दांना दररोजच्या प्रक्रियेत न आणता तरुणांनी समाजात मिसळायचे, अर्थकारणाला वेग द्यायचा आणि आपली प्रक्रिया पुढे ढकलायची. हा शहाजोगपणाचा निर्णय आता सरकारने घेतला आहे. अर्थात सर्व धोके जाणून तो जाणूनबुजून घेतलेला आहे.
कोरोनायुक्त का व्हायचे?
लॉकडाऊन हा काही पर्याय नव्हता हे सर्वांच्याच लक्षात आले आहे, पाश्चात्यांचे अंधानुकरण करण्यात आणखी एक अनुकरण आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केले. अर्थात लॉकडाऊनचा निर्णय चुकीचा झाला असा नव्हे, आपल्याकडे कोणी रस्त्यावर फिरकू नये म्हणून रस्त्यावर वाघ सोडलेत अशी दवंडी जर अगोदरच्या दिवशी पिटली आणि खरोखरच वाघांना रस्त्यावर सोडले तर वाघ कसा दिसतो हे पाहण्यासाठी निम्मे लोक किंवा नेहमीपेक्षा अधिक लोक निश्चित रस्त्यावर येतील. त्यामुळेच कोरोनाचा सामना करण्याएवढी आरोग्य यंत्रणा आपल्याकडे सक्षम नसल्याने सरकारने लॉकडाऊनचा पर्याय आखला. तो यशस्वीही झाला. कदाचित त्यामुळेच इतर देशांच्या तुलनेत खूप कमी वेगाने कोरोनाचा कम्युनिटी प्रसार झाला. आता देखील मृत्यूचे प्रमाण खूप कमी झाले आहे. रुग्ण आढळत आहेत, त्यापेक्षा अधिक संख्येने ते दररोज बरे होत आहेत ही दिलासा देणारी बाब आहे आणि याचाच विचार करून कोरोना थांबणार नाही, तो किमान एका दशकाचा आपला सोबती आहे, याचा विचार करून त्याला साधारण फ्ल्यूच्या ठिकाणी आणण्यासाठी सामूहिक रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीही सरकारने सारी बंधने अनलॉक केली आहेत. यापुढील काळातही अनेक रुग्ण कोरोनाची लागण झालेले आढळतील. मात्र यापुढील काळात आता सुरू असलेले व्यवहार कायम सुरू राहतील. कोरोना रुग्णांपुरते, त्याच्या संपर्कापुरत्या लोकांच्या चाचण्या होतील आणि जगरहाटी मात्र कायम राहील. आणखी एक गोष्ट म्हणजे एकदा कोरोनाची लागण झाली आणि त्यातून एकदा का रुग्ण बरा झाला की, त्याला पुन्हा कोरोना होत नाही, (अगदीच अपवादात्मक बाब सोडून) म्हणूनही हा अनलॉक पर्याय सरकारने खुला केला असावा. म्हणूनच आता तीन महिने बंद ठेवलेले व्यवसाय, उद्योग, लघुउद्योग पूर्ण गतीने सुरू करून कोरोनाशी दोस्ती करावी लागेल. फक्त त्यासाठी काही गोष्टी निश्चित पाळाव्या लागतील. मास्क, सॅनिटायझर आणि फिजीकल डिस्टन्सिंग या गोष्टी अगदी पाचवीला पुजलेल्या राहतील. बहुधा भविष्यातही होऊ घातलेल्या कोणत्याही संसर्गजन्य विषाणूचा सामना करण्यासाठी या तीन गोष्टी आपल्याला उपकारक ठरतील, जशा त्या कोरोनाच्या काळात ठरल्या आहेत.
थोडक्यात आता आपल्याला कोरोनायुक्त व्हावे लागेल. त्याची कोणीतीही भीती न बाळगता..! येणाऱ्या काळात जे घडणार आहे, त्याचाच अर्थ घेत कोरोनायुक्त होण्याची हाक देण्याचे धाडस करावे लागते आहे. आजच्या आर्थिक समस्येतून बाहेर पडायचे, तर कोरोनायुक्त व्हावेच लागेल. तीच काळाची गरज आहे. .!










