दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड – करमाळा तालुक्याच्या शिवेवर जिंती जिंती रोड (जि. सोलापूर) रेल्वे स्थानकावर थांबलेल्या पंढरपूर- दादर एक्सप्रेसवर दरोडा टाकून प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न तेथील रेल्वे सुरक्षा पोलिसांमुळे फसला, मात्र या झटापटीत फौजदार जखमी झाले. बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
सहा अज्ञात दरोडेखोरांच्या झडापडीत रेल्वेचे सहाय्यक फौजदार जखमी झाले आहेत. अशी माहिती रेल्वे पोलीसांनी दिली. पंढरपूर – दादर एक्सप्रेस जिंती रोड रेल्वे रेल्वे स्थानकात क्रॉसिंग साठी थांबली होती.
यादरम्यान अज्ञात सहा दरोडेखोरांच्या टोळीने रेल्वे डब्यात प्रवेश करून रेल्वेतील प्रवाशांचे ऐवज लुटण्याच्या प्रयत्न केला. मात्र त्याठिकाणी असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक अमित जैन यांनी आपल्या सहकार्यांसह धाव घेतली.
रेल्वे पोलीस आणि दरोडेखोर यांच्यात अंधारातत पकडापकडीचा खेळ सुरू झाला. रेल्वे पोलीसांनी सहापैकी दोघांना पकडले. मात्र एकाने सहाय्यक फौजदार वाल्मीक पवार यांच्यावर चाकूने हल्ला करून तो पसार झाला. एका साथिदारास पकडल्याने इतरांनी पोलीसांवर दगडफेक केली.
या अंधाराचा फायदा घेवून हे दरोडेखोर पसार होण्यास यशस्वी झाले. रेल्वे पोलीस या अज्ञात दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या एका दरोडेखोराची झडती घेतली असता त्याच्याकडे दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य रेल्वे पोलिसांना मिळून आले.
पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला, दरोड्याचा प्रयत्न या कायद्याअंतर्गत लोहमार्ग पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, करमाळा तालुक्यातील जिंती, पारेवाडी रेल्वे स्थानकात गाड्या क्रॉसिंगसाठी थांबल्या की, याचा फायदा घेत थांबलेल्या गाडीतील प्रवाशांना लुटण्याचे प्रकार सध्या या भागात घडत आहेत. या घटनांमुळे याठिकाणी रेल्वे पोलीसांची सुरक्षेतेच्या दृष्टीने मोठी गस्त ठेवली आहे.