सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
शेततळ्यासाठी दिलेला कागद निकृष्ठ दर्जाचा असल्याने व त्यामुळे तयार केलेले शेततळे वेळोवेळी लिकेज होवुन नुकसान झाल्यामुळे इंदापूरच्या शेतकऱ्यांनी कागदाच्या नामांकित कंपनीस व कंपनीचे अधिकृत डिलर यांना वेळोवेळी माहिती दिली.
मात्र त्यांनी शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करत टाळाटाळ केली. त्यामुळे हताश झालेल्या इंदापूरच्या शेतकऱ्याने थेट ग्राहक न्यायालयाकडे न्याय मागण्यासाठी धाव घेतली. शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार गुजरात काफ्ट इंडस्ट्रीज लि.या कंपनीस तसेच विहान इंटरप्राईजेस कंपनी यांना ग्राहक न्यायालयाने संयुक्त रित्या १ लाख ५५ हजार २१६ रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
याबाबत माहिती अशी की इंदापूर येथील शेतकरी भागवत बाजीराव देवकर यांनी सन २०१७ साली जमीन गट नं. ६७/१/ब मध्ये शेततळे खोदल्यानंतर त्यासाठी आवश्यक असलेला कागद दि. २६/१२/२०१७ रोजी गुजरात काफ्ट इंडस्ट्रीज लि. या नामांकीत कंपनीचा कागद डिलर विहान इंटरप्रायजेस डुडुळगांव,ता.हवेली, जि.पुणे यांचे प्रो.प्रा.गणेश दिलीप वाबळे व के.डी.कांबळे यांचेमार्फत खरेदी केलेला होता.
परंतु खरेदी केलेला कागद डिलर यांनी जॉईन्ट करून देण्याची जबाबदारी यांचेवर होती. सदरचा कागद निकृष्ठ दर्जाचा असल्याने व त्यामुळे तयार केलेले शेततळे वेळोवेळी लिकेज होवुन नुकसान झाल्यामुळे तक्रारदार भागवत बाजीराव देवकर यांनी अनेकवेळा गुजरात काफ्ट इंडस्ट्रीज लि.या नामांकीत कंपनीस तसेच कंपनीचे अधिकृत डिलर विहान इंटरप्रायजेस (डुडुळगांव ता. हवेली,जि.पुणे) यांचे मालक गणेश दिलीप वाबळे व के. डी. कांबळे यांना वेळोवेळी समक्ष भेटुन तसेच फोनव्दारे, ई मेलव्दारे व अर्ज करून माहिती दिलेली होती.
त्याची काहीही दखल कंपनी अथवा डिलर यांनी न घेतल्याने शेवटी नाईलाजाने भागवत बाजीराव देवकर यांनी अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, पुणे यांचे समोर तकार अर्ज क्र. ३११/२०१९ अन्वये दि. २३/९/२०१९ रोजी रितसर तक्रार दाखल करून नुकसान भरपाईची मागणी केली.
ग्राहक न्यायालयाने दोन्ही पक्षांना आपली बाजू मांडण्याची समसमान संधी दिली. अखेर पुराव्याअंती गुजरात काफ्ट इंडस्ट्रीज लि तसेच विहान इंटरप्रायजेसतर्फे गणेश दिलीप वाबळे व के.डी.कांबळे यांना वैयक्तीक व संयुक्तीकरित्या दोषी ठरवत तक्रारदार यांचा मायकॉन पेपर स्विकारलेचे दिवशी रक्कम १ लाख २७ हजार २१६ रूपये द्यावेत तसेच नुकसान भरपाई म्हणुन रक्कम २५ हजार व तक्रारीचा खर्च रक्कम ३ हजार अशी एकुण रक्कम १ लाख ५५ हजार २१६ रुपये एवढी रक्कम देण्याचा आदेश केलेला आहे.
या वेळी तक्रारदार तर्फे ॲड.राकेश रमेश शुक्ल यांनी काम पाहिले.