दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, कष्टकरी महिलांना, बेरोजगार आणि होतकरू महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, त्यांचे जीवनमान उंचावे, त्यांना स्वतःचा व्यवसाय करता यावा त्यासाठी तालुक्यातील महिला बचत गटांना सर्वतोपरी मदत केली जाईल, त्यांना पंचायत समितीच्या माध्यमातून ताकद दिली जाईल, असे मत दौंड पंचायत समितीच्या सभापती हेमलता फडके यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नती अभियान (उमेद),
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि दौंड पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वरवंड, कडेठाण, हातवळण, बोरीपारधी, कानगाव या गावातील महिला बचत गट, अंगणवाडी सेविका यांची बैठक नुकतीच दौंड पंचायत समितीच्या सभापती हेमलता फडके यांच्या उपस्थितीत वरवंड ग्रामपंचायत येथील सभागृहात नुकतीच पार पडली.
या बैठकीत महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरण करण्याकरिता महिला बचत गटांच्या विविध योजनेला सुरुवात केली. त्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात एक लाख बचत गट स्थापन करण्याचा उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे, तसेच प्रत्येक गावातील प्रभागानुसार CRP ताई यांची निवड करण्यात येणार आहे.
घर टु घर सर्वेक्षण करून बचत गटाची बांधणी करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच अस्मिता भवन मागणी प्रस्ताव, प्रत्येक गावात ग्रामसंघ तयार करणे व प्रभाग संघ करिता न्यता देणे, फिरता निधी देणे, समूह गुंतवणूक निधी देणे, बचत गटातील महिलांना वेगवेगळे प्रशिक्षण देऊन त्यांच्या हाताला काम देणे, महिलांनी सुरू केलेला व्यवसायाची अमेझॉन वर विक्री करणे, असा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी दौंड पंचायत समिती सभापती हेमलता फडके, वरवंडच्या सरपंच मिना दिवेकर, श्रीशक्ती प्रभाग संघाचे अध्यक्ष रामेश्वरी कुडले, महाराष्ट्र राज्य दारूबंदी समिती अध्यक्ष मंगेश फडके, अंगणवाडी सेविका व बचत गटाच्या महिला प्रतिनिधी उपस्थित होते.











