मी पाहिलेली माणसं : डॉ. नाना झगडे, इंदापूर, पुणे
बारामती तालुक्यातील लोखंडवाडीत एका कामानिमित्त मी, डॉ. विशाल पावसे, डॉ. स्वप्नील जगताप गेलो होतो. रस्त्याच्या कडेला असलेल्या हनुमान मंदिराजवळ थांबून आम्ही आमचा मित्र अमोल भोसलेची वाट पाहत होतो. तेवढ्यात तिथं फिकट गुलालाने माखलेला सदरा, धोतर, डोक्यावर पटका बांधलेला, कपाळाला गळ्याला गुलाल, अष्ठगंध लावलेला म्हातारा गृहस्थ आमच्या जवळ येऊन आमच्याशी बोलू लागला.
माझं नाव मल्हारी कारंडे , सगळे मला देवबाप्पा म्हणतात, वय नव्वद आन दोन. गोरी माणसं बघितल्यात म्या. मला लय जमीन हाय ही दिसती ती सगळी माझीच. मी काय बघत नाय माझे पुतणे सगळं बघत्यात. माझं कुटुंब मोठं हाय. तीस वर्ष झाली माळ घातलीया. माझ्यामुळं बऱ्याच माणसांनी माळ घातलीय. नायकोबा माझ्या अंगात येतो; मोठा खेळ भरतो…” असं काहीबाही सांगत होता. त्याच बरोबर तुम्ही कुठून आलात, इथं कुणाकडं आलात. असं आम्हाला विचारत होता? त्याच्या चौकस आणि चाणाक्ष बुद्धीची झलक बोलण्यातून दिसत होती.
“आता पतोर मला दोन एकशे पोरं झाली.” हे वाक्य ऐकताच आम्ही पुरते उडालोच !
काय सांगता ? मग बायका किती तुम्हाला ?
मी न राहून विचारलं ? सदऱ्याच्या खिशातील तंबाखूची पिशवी काढून तंबाखू मळत देवबाप्पा म्हणाला, ” मला इतकी पोरं कशी व्हात्याल, काय बोलताय तुम्हीबी. आवं म्या देवबाप्पा हाये.” तरी आम्हाला त्याचं कोडं उलघडत नव्हतं. तो पुढं सांगत राहिला.
सातारा, पाटस, दौंड, इंदापूर अशी लांब लांबून मूल-बाळ नसणारे लोकं माझ्याकडे यायची. अर्दी गुळाची ढेप संपायची. परसाद लावायचा, सटवाई, करणी धरणी काय आसंल-नसंल तर बघायचं. आपुन तसली कुणाची लांडी लबाडी कधी केली नाय.” आता आमच्या लक्षात आलं की हा देवऋषी असावा.
विशाल म्हणाला, “तुम्ही देवऋषी आहात का?” सगळ्या अंगासह मान डुलवत देवबाप्पा म्हणाला, “व्हय देवरुखी!”. विशालने विचारलं आता येतात का माणसं तुमच्याकडं” देवबाप्पा त्रासिक होऊन म्हणाले, ” आता काय खरं राहिलंय, माणसं लय वंगाळ निघालीत, बघवत नाय, खुडमती करत्यात. ‘खुडमती’ म्हणजे काय ? हे आम्हाला कळलं नाही म्हणून परत विचारलं तर ‘करणीबिरणी’ करत्यात असं त्याने सांगितलं.
मारुतीच्या मंदिराकडे त्याने आम्हाला नेलं, अन म्हणाला, ” पोरं गेट लावून घेतत्यात, घ्या इथनच दरशान, हा मारुती उघड्यावर होता. म्याच पुढं व्हवून हे मंदिर बांधलं. लोकांनी वर्गणी करून पैकं उभा केलं. पनास लाखापेक्षा जास्त पैकं गेलं याला. ही जागा माझीच हाय.” आम्ही म्हटलं बारामतीतून मदत मिळाली असेलकी. तर तो म्हणाला मंदिराला नाय शाळा मिळाली त्यांच्या कडून.
त्याचं असं झालं तुम्हाला सांगतो, दादा बारामती वरून मुबंईला निघाल्यालं, मंत्री व्हायचं होतं. वडगावला लय लोकं उभी होती. मी बाजूला उभा व्हतो. दादांनी मला हाक मारली, दादा मनलं, “देवबाप्पा तुमाला इसरून कसं चालंल”, “मी मनलं, “आमच्या धनगरवाडीला शाळा दया, त्यांनी सातवी पतोर शाळा बांधून दिली. म्या शाळंला धा-पंधरा पांड जागा दिली. चला मी दाखवतो तुम्हाला.” शाळा दाखवताना देवबाप्पा भारावून गेला होता.
शाळेच्या रूपाने केलेली त्याची ‘करणी’ मोठी होती. शाळेला जागा देणाऱ्या देवबाप्पात आता मला ‘देवपण’ दिसायला लागलं होतं. पूर्वार्धात काळ्याकुट्ट अंधारत नेणारा देवबाप्पा आता उजेड दाखवत होता. धनगरवाड्यातल्या या शाळेतून विद्येबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन येणाऱ्या पिढीत रुजेल असा विचार मनात घोळू लागला.
तिथूनच “ते बघा माझं घर… घरी चला…च्या प्यायला चला” असं देवबाप्पा सारखं म्हणत होता. आम्ही नको म्हणत .. गाडीत बसल्यावर देवबाप्पाला हात जोडले. निरोप घेताना देवबाप्पा म्हणाले, “एखाद्या रविवारी या…तुमचं काय आसलं तर बघू….!”











