बारामती : महान्यूज लाईव्ह
येथील श्री.काशिविश्वेश्वर तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 61 रक्तदात्यांनी उत्फूर्तपणे रक्तदान केले. येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित माणिकबाई चंदुलाल सराफ रक्तपेढीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
रक्ताचा तुटवडा असल्याने रक्तपेढ्यांनी रक्तदानाचे आवाहन केले होते. त्याला समाजातून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा सुरू असतानाच, काशीविश्वेश्वर तरुण मंडळ पुढे आले आणि त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले. सध्या रक्ताचा तुटवडा आला आहे. त्यामुळे इतरही तरुण मंडळांनी याचे अनुकरण करण्याची आवश्यकता आहे.
बारामतीच्या रक्तपेढीच्या आवाहनानंतर नगरपरिषदेचे गटनेते सचिन सातव यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक सुरज सातव यांनी काशीविश्वेश्वर तरुण मंडळाच्या वतीने शिबिराचे तात्काळ आयोजन केले आणि याला अचानकपणे आयोजन करून देखील तब्बल 61 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदात्यांनो सावध व्हा…!
बारामती आणि परिसरात अनेक रक्तदान शिबिरे होतात. ती शिबिरे पुणे, सोलापूर, बार्शी येथील रक्तपेढ्या बारामतीत येऊन आमिष दाखवून रक्त संकलन करून जातात. ज्याचा स्थानिक गरजू रुग्णाला उपयोग होत नाही. त्यामुळे रक्तदान शिबीर आयोजकांनी स्थानिक रक्तपेढीतच रक्तदान शिबीर आयोजित करावे असे आवाहन ब्लड बँकेचे सचिव डॉ. अशोक दोशी यांनी केले आहे.











