कोरोनाच्या काळात अनेक ठिकाणी जावयांची तारांबळ…!
बारामती : महान्यूज लाईव्ह
जावई असते, सासरवाडीसाठी नाजूक गोष्ट…सासरवाडीसाठी जावई असतो भला माणूस…! का? कारण दगडाखाली हात असतो ना…लेक नांदायची असते तिकडे…मग त्यासाठी जावयाकरीता सतत हिरवा गालिचा अंथरलेला असतो..पण कोरोनाने खूप गंमती घडवल्या…आणि जावयांची पहिल्यांदाच भलतीच बेंबळ केली..!
कोरोनाचा लॉकडाऊनचा काळ शहरात जीव घुसमटल्याने गावाकडे जाऊ म्हणणाऱ्या जावयांसाठी काही चांगला गेला नाही. गावाकडं वातावरण मोकळंढाकळं होतं खरं..पण कोरोनापेक्षा पुण्या-मुंबईकरांची धास्ती गावाकडं जास्त होती..त्यातून काही ठिकाणी सासरे-जावयांची, काही ठिकाणी गावकरी आणि सासरे-जावयांची भांडणे झाली, तर काही ठिकाणी जावयांना आल्या पावली परतावे लागले. त्याचे काही किस्से…
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात एक जावई शहरात फारच त्रास होतोय म्हणून सासऱ्यांशी बोलला. सासऱ्यांनी देखील जावयाची, लेकीची फार अडचण होतेय म्हणून लागलीच संमती दिली. तुम्ही तिकडची परवानगी काढा आणि लगेच इकडे या, सुट्टीपण होईल असे सांगितले. तिकडे जावयाच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या. पासेसची सोय उपलब्ध नसल्याने रात्रीच्या अंधारातच आडवाटा शोधून जावयांनी सासरवाडी गाठली. पुण्या-मुंबईतून येणारे लोक म्हणजे सोबत कोरोनाच आणतात या भीतीत असलेल्या गावकऱ्यांना हे पुण्याहून सांग्रसंगीत बिऱ्हाड गावात पोचल्याचे कळताच गावकऱ्यांनी लागलीच सासऱ्यांचे घर गाठले. सुरवातीलाच गावकऱ्यांनी सासऱ्याला लेकी, जावयाला आपण कोरोनानंतर बोलवू, चांगला पाहुणचार करू, पण आता नको, असे सांगत आता आल्या पावली परत जाऊ द्या असा आग्रह गावकऱ्यांनी धरला. सासऱ्याने गयावया करताच घराभोवती खंदक खांदण्याचा इशारा संतप्त लोकांनी दिला. मग मात्र लेक, जावयाला आल्या पावली परतावे लागले. येताना फार दिव्य करावे लागलेल्या जावयापुढे मात्र आता जाणार कसे? हा गहन प्रश्न उभा राहीला. कुठून या फंदात पडलो असे वाटून त्याने मामांबरोबर भांडणच काढले..
आणखी एक किस्सा असा की, जावयाने मामांना फोन करून तिकडे येऊ का? असा सवाल केला. मामांनी दोन क्षण विचार करून ठिक आहे, फक्त येथे पुण्या-मुंबईतून कोणाला येऊ देत नाहीत, पण मी काहीतरी व्यवस्था करतो असे सांगितले. चार दिवसांनी मामांनी जावयाला बिनधास्त या म्हणून निरोप दिला. जावयाचा आनंद गगनात मावेना..निरोपानंतर मात्र दुपारी मेव्हण्यांनी व्हिडिओ कॉल करीत भावोजींना त्यांचे नवे घर दाखवले. माळरानावर असलेल्या शेतात मेव्हण्यांसाठी चक्क शेड बांधल्याचे समजताच जावयाच्या पायाखालची वाळू सरकली. क्वारंटाईन हा शब्द सारखा कानात घुमत राहीला..आणि जावयाने व्हिडीओ कॉल कट करून गड्या पुण्यातच बरे म्हणत गावी जायचा बेत रद्द केला.
आणखी एक किस्सा असा की, लेकीला घरी आणायचे म्हणून वडीलांनी जावयाला फोन केला आणि लेकीला सोडायला आलेला जावई इकडचे सगळे मोकळे वातावरण बघून भांबावला. शहरातील घरकोंबडेपणाला कंटाळून गेलेला जावई त्याचा परत घरी परतायचा बेत रद्द करून आता इकडेच राहतो असे सासऱ्याला म्हणू लागला. सासऱ्याला काही ते पटले नाही. मात्र वरकरणी काही न दाखवता त्याने बाजूला जाऊन थेट आरोग्य खाते व पोलिसांना फोन केला व जावयाला क्वारंटाईन करायचेय असे सांगितले. स्वतःहून फोन आलाय म्हटल्यावर आरोग्य खात्यालाही बरे वाटले. सासऱ्यांनी जावयाला जेवण देऊन पाहुणे चला फिरून येऊ असे म्हणत थेट क्वारंटाईनच्या खोलीकडेच आणले. खोली पाहताच जावयाचे डोके भडकले आणि सासरे- जावयांची जुंपली. मात्र शासकीय कर्मचाऱ्यांपुढे कोणाचेच काही चालले नाही आणि अखेर जावई आपल्याच सासरवाडीत एकटाच क्वारंटाईन झाला आणि पण जसा आडवाटा शोधत आला, तसाच रात्रीच्या वेळी निघूनही गेला..!











