• Contact us
  • About us
Saturday, June 13, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्रतस्थ कर्मयोगिनी : राजमाता अहिल्यादेवी होळकर

Maha News Live by Maha News Live
May 31, 2020
in शेती शिवार, महिला विश्व, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, लाईव्ह, व्यक्ती विशेष, Featured
0
व्रतस्थ कर्मयोगिनी : राजमाता अहिल्यादेवी होळकर

अन्वयार्थ

प्रा. अरूण शामराव कोळेकर,
मराठी विभागप्रमुख,
शरदचंद्रजी पवार महाविद्यालय, जेजूरी, ता. पुरंदर

महाराष्ट्राची ही भूमी धारकऱ्यांची, वारकऱ्यांची! ही भूमी ऋषीमुनींची, योगियांची आणि ही भूमी स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्यांची देखील.. ही भूमी आहे, कष्टकऱ्यांची – श्रमकऱ्यांची. या भूमीत अनेकानेक थोर थोर जन्मले. आपली नाममु्द्रा काळाच्या ललाटावर उमटवून गेले, जसे पुरूष तशाच स्त्रियाही यामध्ये समाविष्ठ होत्या. ज्यांनी आपले कर्तृत्व गाजवले, समाजाने त्यांच्या पालख्या वाहिल्या, पुतळे केले. स्मारके बांधली, त्यांना अंगाखांद्यावर मिरवले. आजही त्यांच्या नावाचे जयजयकार या मातीत निनादत आहेत. पुढेही असेच जयघोष आसमंतात घुमत राहतील. अशा शूरांना, वीरांना, रणरागिनींना महाराष्ट्राची अस्मिता कधीच विसरणार नाही. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता इथल्या मराठी मातीत, मनात आणि उरा-उरांत अभंग राहील. कारण ते लढले, जगले ते स्वतःसाठी नाही, तर दुसऱ्यांसाठी, जनतेसाठी..! काळाच्या पटलावर त्यांनी आपले भविष्य पेरले. त्यांच्या कृतीपुढे, कार्यापुढे आपण नतमस्तक व्हावे, इतके चिरस्मरणीय कार्य त्यांनी पुढील पिढ्यांसाठी लखलखीत करून ठेवले.
प्रत्येक शतकात थोर माणसं जन्माला येतात, ती शतकानुशतके अजरामर होतात. त्यातीलच एक व्रतस्थ नाव म्हणजे कर्मयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर. एका सामान्य कुटुंबातील जन्माला आलेली ही पोर, पण साऱ्या जगात अजरामर ठरली. माणसं जन्मानं, जाती- धर्मानं मोठी कधीच होत नाहीत, ती मोठी होतात, त्यांनी केलेल्या अतुलनीय कामातून! असेच जगण्याचे भाग्य अहिल्याबाईंच्या वाट्याला आले. सत्ता गाजविणाऱ्या अनेक कर्तृत्ववान स्त्रिया या शतकाने पाहिल्या, पण अहिल्याबाईंचे वेगळेपण निश्चित असामान्य, अलौकिक असेच राहीले.
अहिल्याबाई बीड परगण्यातील चौंडीच्या माणकोजी – सुशीला शिंदे यांच्या पोटी ३१ मे १७२५ रोजी जन्मल्या. माणकोजी गावचे पाटील. प्रतिष्ठित असले तरी सर्वसामान्य जीवन जगणारे व्यक्तीमत्व होते. अशा कुटुंबाचे मल्हारराव- गौतमाबाई होळकर यांच्या कुटुंबाशी सोयरीक जुळली. मल्हारराव खंडोजी होळकरांचा एकुलता एक मुलगा. खंडोजी होळकर हे निरा-होळ गावचे ग्रामाधिकारी. मल्हारराव तीन वर्षाचे असतानाच वडील खंडोजी वारले. मल्हाररावांची आई जिवाई या पतीच्या मृत्यूनंतर मल्हारींना घेऊन आपल्य माहेरी खानदेशात सुलतानपूर-तळोदे या गावी आल्या. जिवाईंना आणि मल्हारींना त्यांच्या वडील आणि भावांनी आधार दिला. मल्हारराव आपल्या मामांची-आजोबांची मेंढरे राखू लागले. काळानुसार समाजपरंपरेनुसार वयाच्या आठव्या वर्षी मल्हारीचं लग्न गौतमाबाईंशी झालं. काही दिवसांनी बाजीराव पेशव्यांची मल्हाररावांशी भेट झाली. बाजीरावांच्या चाणाक्ष नजरेने मल्हाररावातील लढाऊ, पराक्रमी वृत्ती अचूक हेरली. हाच मल्हारराव पुढे मराठेशाहीचा आधारस्तंभ ठरला. सुभेदार – सरदार म्हणून ओळखला जाऊ लागला. तो पेशव्यांचा मानकरी ठरला. मराठ्यांच्या माळव्यातल्या शक्तीचे केंद्रस्थान बनला. माळवा प्रदेश मल्हाररावांची कर्मभूमी बनली. त्या प्रदेशातील इंदूर मल्हाररावांची राजधानी बनली. मल्हारराव पेशव्यांच्या दोन पिढ्यांचे साक्षीदार बनले.
दसऱ्याच्या दिवशी मल्हारराव – गौतमीबाईंच्या पोटी खंडेराव जन्माला आले. सन १७२३चे ते साल होते. होळकर घराण्याचे खंडोबा हे कुलदैवत. म्हणून मुलाचे नाव खंडेराव ठेवले. खंडेराव नऊ वर्षाचा असतानाच त्यांचा अहिल्याबाईंशी विवाह झाला. अहिल्या आठ वर्षाच्या असतानाच मल्हारराव- गौतमीबाईंची सून म्हणून इंदूरच्या होळकरवाड्यात त्यांनी प्रवेश केला.
अहिल्याबाईंना सत्तर वर्षाचे आयुष्य लाभले. त्या आयुष्यात त्यांना बरंच काही सोसावं – भोगावं लागलं आणि त्याचबरोबरीने चांगलेही करून दाखवता आलं. अनेक आघात, प्रसंग त्यांच्या वाट्याला आले. अहिल्याबाईंना एकवीस वर्षाचे खंडेरावाबरोबर सहजीवन अनुभवता आले. या सहजीवनातून त्यांच्या पोटी मालेराव व मुक्ताबाईंचा जन्म झाला.
पुढे दुर्दैवाने खंडेराव हे कुंभेरीच्या किल्ल्याभोवतीच्या वेढ्यात झालेल्या युध्दात १७ मार्च १७५४ रोजी कामी आले. या घटनेने वयाच्या २९ व्या वर्षी अहिल्याबाईंना वैधव्य आले. अहिल्याबाईंच्या आयुष्यातील पहिले संकट त्यांच्या वाट्याला आले. खरेतर तो काळ वैधव्यानंतर सती जाण्याच्या परंपरेचा होता. मात्र सासरे मल्हाररावांनी आपल्या सुनेला अहिल्याबाईंना सती जाण्याच्या निर्णयापासून, प्रसंगापासून परावृत्त करण्याचा निकराने प्रयत्न केला आणि अहिल्याबाईंनी त्या निर्णयाचा आदर केला. कारण काळाला, रयतेला राजमाता, कर्मयोगिनी, व्रतस्थ साध्वी अहिल्याबाई हवी होती.
मल्हाररावांच्या पराक्रमी, लढवय्या संस्कारातून अहिल्याबाईंना बरंच काही शिकता आले. समजून घेता आले. त्यामुळेच अहिल्याबाई आपल्या पतीच्या निधनानंतर डगमगल्या नाहीत. खंबीरपणे धीरोदात्तपणे मल्हारराव होळकरांचा उजवा हात म्हणून काम करू लागल्या. मल्हारराव देखील अहिल्याबाईंकडे जबाबदारीची कामे सोपवू लागले. अहिल्याबाई त्या जबाबदाऱ्या आत्मविश्वासाने पार पाडू लागल्या. खंडेरावापेक्षा राज्यकारभार करण्यात अहिल्याबाई सरस असल्याची जाणीव मल्हाररावांना अगोदरच होती. त्याचा प्रत्यय वेळोवेळी येत गेला. आपल्या सासऱ्यांचा राज्यकारभार, सरदारपणा अहिल्यादेवी बारकाईने जवळून पाहत, अनुभवत होत्या. जात्याच सत्शील, धर्मशील असं त्यांचं व्यक्तीमत्व रयतेला अधिकाधिक आवडू लागले. जनमाणसात त्या स्थिरावू लागल्या. अहिल्याबाईंकडे राज्यकारभाराची उत्तम अशी समज होती. समंजसपणा होता. इंदूरच्या वाड्यातील संस्काराने त्या वाढल्या. त्या वाड्याने त्यांना बरंच काही शिकवले. व्यवहाराचा चोखपणा अहिल्याबाईंच्या अंगी असल्याकारणाने राज्यकारभाराला एक आर्थिक शिस्त त्यांनी लावली. मल्हाररावांच्या खजिन्याची चावी अहिल्याबाईंच्या ताब्यात आली. पण तो खजिना त्यांनी होळकरशाहीतील रयतेसाठी वापरला.
अहिल्याबाईंच्या आय़ुष्यात संकटांनी पाठ कधी सोडली नाही. पती खंडेरावाच्या निधनानंतर सासरे मल्हाररावांचा मृत्यू १७६६ मध्ये झाला. मल्हाररावांनंतर मालेराव या राज्याचे वारस बनले. मात्र त्यांचाही मृत्यू २७ मार्च १७६७ रोजी झाला. घरातील कर्त्यां पुरूषांच्या जाण्याने अहिल्याबाईंच्या भावविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली. मात्र अहिल्याबाई धीरोदात्तपणे आलेल्या संकटाला तोंड देत राज्यकारभार करीत राहील्या. त्या ११ डिसेंबर १७६७ रोजी सत्तेवर आरूढ झाल्या. दुःख बाजूला सारून राज्याचा कारभार करण्याची त्यांची स्वाभाविक, सहजवृत्ती उठून दिसू लागली. त्यांच्या एकूणच जगण्या, वागण्याला, व्यवहाराला नैतिक अधिष्ठात होतं. त्या बळावरच अहिल्यादेवी रयतेसाठी, होळकरशाहीसाठी सदैव कार्य करीत राहील्या.
मुलकी कारभारात कमालीच्या दक्ष, आपल्या उत्पन्नातील, खजिन्याच्या आर्थिक व्यवहारातील त्यांची शिस्त, काटेकोरपणा, एखाद्या कसबी, कुशल अर्थतज्ज्ञासारखा होता. त्यांनी केलेल्या व आज उपलब्ध असलेल्या पत्रव्यवहारातील मजकूराच्या नोंदीवरून, भाषाशैलीवरून अर्थशास्त्राची उत्तम जाण त्यांना होती याची साक्ष पटते. त्यांनी बांधलेले कोरिव, घडीव, वास्तूशिल्पाची अजोड जोड असलेली सौंदर्यासक्त मंदिरे, घाट, तळी, धर्मशाळा, अन्नछत्रे त्या उच्च दर्जाची साक्ष आजही देतात.
समाजशास्त्र व मानसशास्त्र यांच्यातील नेमक्या गुणवैशिष्ठ्यांचा वापर त्यांनी प्रसंगानुसार केला. त्या जनभावनांचा आदर करणाऱ्या हितरक्षक होत्या. सभोवताली काय घडते आहे, काय घडू शकते याचा त्या सतत अंदाज घेत. अहिल्याबाईंच्या स्वभावगुणांचे, कार्यशैलीचे वस्तुनिष्ठ असे दर्शन घडते, ते त्यांनी केलेल्या प्रसंगोत्पात व्यवहारातून! आज जो काही थोडाफार पत्रव्यवहार उपलब्ध आहे, त्यामधून अहिल्याबाईंच्या ठिकाणी असणारा दूरदर्शीपणा, करारीपणा, बाणेदारपणा, ठामपणा, निष्ठावंतपणा, व्यवस्थापकीय कौशल्य. आत्मविश्वास अशा एक ना अनेक गुणांचे दर्शन घडत राहते. या गुणांचे त्यांनी प्रसंगानुरूप वेळोवेळी कुशलपणे व दक्षतेने वापर केल्याचेही दिसून येते.
राघोबादादांची त्यांनी केलेला संघर्ष त्यांच्यातील स्वाभिमानी, निर्भय आणि बाणेदारपणाचे दर्शन घडविणारा आहे. अहिल्याबाईंचे राज्य आपल्या अधिपत्याखाली आणण्यासाठी राघोबादादा जे प्रयत्न करीत होते, त्या प्रयत्नांना त्यांनी करारीपणे, मुत्सद्दीपणे व स्वाभीमानी वृत्तीने सुरूंग लावला. माधवराव पेशव्यांनी अहिल्याबाईंना कारभार करण्याचा जो अधिकार दिला, तो मल्हारराव होळकरांच्या एकनिष्ठ सेवेपायी तर होताच होता, परंतू अहिल्याबाईंकडे असणाऱ्या गुणवैशिष्ठ्यांमुळेही होता. अहिल्याबाईंच्या वागण्यात असणारी धार्मिकता, कारभारातील पारदर्शीपणा, काटेकोर हिशोबीपणा माधवराव पेशव्यांनी वेळीच ओळखला होता. त्यामुळे अहिल्याबाईंविषयी त्यांच्या मनात पूर्ण विश्वास होता. पेशव्यांचे नम्र सेवक, पाईक म्हणून त्यांनी आयुष्यभर काम केले. पण आपला बाणेदारपणा कधीही सोडला नाही.
रयतेला न्याय मिळेल, त्यांची बूज राखली जाईल अशीच त्यांच्या कामाची पध्दत व न्यायनिवाडा करण्याची रित होती. राज्यकारभार हाती घेताना अहिल्याबाईंनी जी प्रतिज्ञा घेतली, ती प्रतिज्ञा अहिल्याबाई ज्या महेश्वराच्या वाड्य़ात राहत होत्या. त्या ठिकाणी ती प्रतिज्ञा आजही आहे. त्या म्हणतात, माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे, माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वतः जबाबदार आहे. सत्तेच्या अधिकारामुळे मी येथे जे काही करीत आहे, त्या प्रत्येक कृत्याचा जाब मला परमेश्वरापुढे देणे आहे, परमेश्वराने ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवल्या आहेत, त्या मला पार पाडावयाच्या आहेत.
अहिल्याबाई शेतकरी असो, की कष्टकरी..व्यापारी असो की, बारा बलुतेदार असो, त्यांच्या कष्टाचा मोबदला विनाविलंब देत असत. रयतेला मदत करण्याची त्यांची भावना होती. त्यामुळेच रयतेला त्यांच्या विषयी आधार आणि आदर वाटायचा. न्यायप्रिय अहिल्याबाई असा त्यांचा लौकिक सर्वत्र होता. अहिल्याबाई करीत असलेल्या लोकोपयोगी काम, दानधर्मामुळे व रयतेच्या हिताच्या दक्षतेमुळे आणि जवळ असलेल्या धनसंचयामुळे पुणे दरबारात त्यांच्या विषयी एक प्रतिष्ठा, दरारा होता.
या साध्वी, व्रतस्थ राजमातेच्या किती आणि कोणत्या गुणांचे वर्णन करावे? त्यांनी केलेले कार्य आणि स्वभावगुणांमुळे अहिल्याबाई अनेकांच्या लेखनाचा विषय बनल्या. कवी मोरोपंतांनी त्यांच्यावर आर्या लिहील्या. कवी अनंतफंदी, शाहीर प्रभाकरानी पोवाडे रचले. माधव ज्युलियन, शांताबाई शेळकेंनी काव्य रचले. डॉ. अॅनी बेझंट यांनी अहिल्याबाई – द ग्रेट रूलर असा गौरव केला. एका पाश्चात्य लेखकाने अहिल्याबाईंची तुलना रशियाची राणी क्याथराईन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याबरोबर करून अहिल्याबाई अनेक गुणांनी कशा सरस होत्या हे नोंदवून ठेवले आहे.
आपल्या मराठी मनाला आणि मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी एक युगस्त्री होऊन गेली. पण आपल्याला असा मोठेपणा हा कोणीतरी पाश्चात्याने लिहील्यावरच कळतो. कारण त्यांच्याकडे गुणांची पारख करण्याची वृत्ती आहे. आपल्याकडे उपेक्षा व वंचना, बेदखल करण्याची जणू रितच आहे. अर्थात अहिल्याबाईंच्या जन्माला आज जवळपास २९४ वर्षे पूर्ण होत आहेत. पण महाराष्ट्रीयच नव्हे तर भारतीय माणूस त्यांनी केलेल्या कार्यापुढे आजही विनम्र व नतमस्तक होताना दिसतो. एक स्त्री आपल्या आयुष्यात किती मोठं काम करू शकते. ही केवळ अतिरंजित, कपोलकल्पित अशी त्यांच्या आयुष्याची कहाणी नाही.
फक्त आज खंत एवढीच वाटते की, आपण सगळेच दुर्दैवी निघालो. आपण सगळ्या महापुरूषांना जातीत वाटून घेतले. त्यांच्या विचारांना, कार्याला संकुचित, मर्यादीत, बंदिस्त करून ठेवले. असे म्हटले जाते की, महापुरूषांचा पराभव दुसरे-तिसरे कोणी करीत नाही, त्यांचे अनुयायीच त्यांच्या विचारांचा पराभव करतात. हे कटू असले तरी वास्तव आहे. आपण आपल्या स्वार्थासाठी व संकुचित राजकारणासाठी महापूरूषांचा आपण करीत असलेला वापर आपणास समाजबांधणी व राष्ट्रबांधणीसाठी कधीही उपयोगी पडणार नाही. हे प्रत्येक समाजातील धुरीणांनी वेळीच ओळखावे. कारण पुढील भावी पिढी व येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही.

Tags: AHILYADEVI HOLKARRAJMATA
Next Post
२० हजार कुटुंबांना राज्यमंत्री भरणे यांची जीवनावश्यक वस्तूंची भेट

२० हजार कुटुंबांना राज्यमंत्री भरणे यांची जीवनावश्यक वस्तूंची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group