जिल्हयातील आजी माजी जिल्हा परिषद सदस्यांनीही घेतला पुण्यात मेळावा.
राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुक सन 2021 च्या होऊ घातलेल्या आगामी पंचवार्षिक निवडणुक कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
या निवडणुकीच्या गट आणि गणाप्रमाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाने चाचपणी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष माजी आमदार रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली दौंड तालुक्यात राष्ट्रवादी कामाला लागली आहे.
दरम्यान, भाजपचे आमदार राहुल कुल हे मात्र सावध भूमिकेत आहेत. आपले राजकीय पत्ते नेहमीप्रमाणे शेवटच्या क्षणी खुले करून हादरा देण्याच्या तयारीत ते असल्याचे चित्र आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि गावगाड्याच्या अर्थात ग्रामपंचायत निवडणुका काही महिन्यापुर्वी संपल्या आहेत. गावगाड्यातील तापलेले राजकीय वातावरण कुठे तरी शांत झालेले असतानाच, आता पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.
या निमित्ताने राजकीय वातावरण, राजकीय डावपेच, राजीनामा नाट्य, पक्षांतर नाट्य, नाराजी नाट्य अशा अनेक गमतीजंमती पहावयास मिळणार आहेत. राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव आणि कोरोना बाधीत रूग्णांची संख्या वाढल्याने ग्रामपंचायत आणि सहकार क्षेत्रातील निवडणुका पुढे ढकल्या गेल्या होत्या, मात्र तरीही कोरोनाच्या लाटेतच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या.
आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुका होणार आहे. त्यातच जिल्ह्यात नगरपरिषदेच्या निवडणुकाही तोंडावर आहेत. यामुळे सध्या सर्व राजकीय पक्षांनी आता या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आणि सत्ता स्थापन, राजकीय वर्चस्व राखण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
त्यासाठी गट आणि गणात बैठका घेवून आढावा घेण्याचे काम सध्या स्थानिक नेत्यांनी सुरू केले आहे. दौंड तालुक्यात मात्र राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाने माजी आमदार रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे तयारी चालवली आहे.
जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात कार्यकर्तांची आढावा बैठक घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यातून कोण कोण कार्यकर्ते इच्छुक आहेत. कोणत्या गटात कोणते आरक्षण निघेल त्यानुसार उमेदवारी निश्चित करण्यात येणार आहे.
मात्र या आढावा बैठकीच्या निमित्ताने चाचपणी करण्यात येत आहे. सध्या दौंडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व कायम राखण्यासाठी पूर्ण नियोजनबध्द आखणी करण्याची तयारी करीत पक्ष या निवडणुकीला सामोरे जाणार आहे.
गट आणि गणात किती विकास कामे केली आहेत. प्रलंबित विकास कामे मार्गी लावून जास्ती जास्त निधी उपलब्ध करून कामे केल्याचे दाखले मतदारापर्यंत कसे पोहचविता येतील याचे या बैठकीत मार्गदर्शन केले जात आहे.
ओबीसी आरक्षणाबाबत संभ्रम…
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण न्यायालयाने काही प्रमाणात रद्द केल्याने अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला राखीव जागा किती असतील? हा एक ओबीसी समाजात संभ्रम निर्माण झाला आहे.
त्यातच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण जाहीर झाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही असा पावित्रा भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला होता. यामुळे भाजपची या निवडणुकीत काय भूमिका हे पाहावे लागणार आहे.
जिल्हयात किती जिल्हा परिदच गट राखीव राहतात आणि तेही कोणत्या तालुक्यात जातात यावरही ओबीसीची राजकीय भुमिका आणि रणनिती ठरली जाणार आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्यांनी घेतला पुण्यात मेळावा..
पुणे जिल्हयातील यापुर्वी जिल्हा परिषद सदस्यपद भुषविलेल्या माजी सदस्यांनी पुण्यात नुकताच सर्वपक्षीय मेळावा पार पडला आहे. या मेळाव्यात जिल्हयातील अनेक आजी माजी सदस्यांनी हजेरी लावली होती.











