दौंड चा एसआरपी ग्रुप मात्र झाला कोरोनामुक्त..
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरातील नेहरूचौक येथील नव्वद वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला. दौंड शहरातील कोरोनाचा हा दुसरा बळी आहे.
मंगळवारी (ता.२६) दौंड शहरात कोरोनाचा पहिला बळी गेला होता. त्याच दिवशी शहरातील नेहरू चौक येथील या नव्वद वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. या जेष्ठ महिलेवर पुण्यात उपचार सुरु होते. शुक्रवारी( ता. २९) रात्री या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला अशी माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
दौंड चा एसआरपी ग्रुप कोरोना मुक्त
दौंड मध्ये कोरोनाने दुसरा बळी घेतला असला तरी आजच दिलासा देणारीही घटना घडली आहे. येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ७ च्या २७ जवानांना जी कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्या सर्व जवानांनी कोरोनावर मात केली असून ते आज कोरोनामुक्त झाले आहेत. एकंदरीत एसआरपी ग्रुप क्रमांक ७ हा संपूर्ण कोरोना मुक्त झाला आहे अशी माहीती राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ७ च्या वैद्यकिय अधिक्षक डॉ. वैशाली खान यांनी दिली.
या गटातील दोनशे जवान मुंबईत कोरोनाच्या बंदोबस्तात होते. ते बंदोबस्त संपवून दौंडला आले होते. त्यानंतर या जवानांना क्वारंटाईन करण्यात आले होते. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून या जवानांची वैद्यकिय तपासणी केली असता टप्याटप्पाने यातील सुमारे २७ जवानांना कोरोनाची लागण झाली होती. याही जवानांवर पुण्यात उपचार सुरू होते.
दौंड मध्ये राज्य राखीव बल गट क्रमांक ७ मधील कोरोना ची लागण झालेले हे सर्व जवान कोरोना मुक्त झाल्याने दौंड करांना दिलासा मिळाला आहे.











