दौंड तालुक्यातील पेडगाव येथील घटना, तिघांवर गुन्हा दाखल.
दौंड : महान्यूज लाईव्ह
भीमा नदीपात्रात सुरू असलेल्या वाळू उपशाच्या बोटीची तक्रार महसूल विभागाला देतो या संशयावरून वाळू माफियांनी रस्त्याचे काम करणाऱ्या एका व्यावसायिकाच्या रस्त्याच्या कामातील जेसीबी मशीनचे ही मोठे नुकसान करून डिझेलची चोरी केली.
याप्रकरणी दौंड पोलीस स्टेशनला तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.
राहुल उर्फे गणेश नारायण ढवळे, किशोर उर्फ बापू किसन ओव्हाळ, संतोष अंकुश काळे (सर्व रा.पेडगाव ता.दौंड जि.पुणे ) असे या आरोपी वाळू माफियांचे नाव आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, पेडगाव ते देऊळगावराजे रस्त्याचे काम सुरू आहे. भीमा नदी पात्रातील बोटीच्या सहाय्याने वाळू उपशा करून ती ट्रक, डंपर या वाहनाच्या सहाय्याने वाळू वाहतुक केली जात आहे.
या वाळू वाहतुक करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यांच्या कामात अडथळा होत असून दुरूस्ती केलेला रस्ता पुन्हा खराब होत आहे. काही दिवसांपुर्वी महसुल विभाग आणि पोलीसांनी भिमा नदी पात्रातील वाळू उपाशावर फायबर बोटी फोडून कारवाई केली होती.
या ठेकेदारानेच वाळू उपशाची तक्रार महसुल विभागाकडे केल्याचा संशयावरून या वाळू माफियांनी पेडगाव ते देऊळगावराजे रस्त्याचे काम करणारे ठेकेदार दिपक राजाराम इंदलकर यांची रस्त्याच्या कामासाठी उभी असलेल्या जेसीबी मशीनची समोरील काचा दगडाच्या सहाय्याने फोडल्या.
इंजीन आईल व हायड्रोलीक आॅईल हे चोरून मशीनचे आॅईलचे टाकीमध्ये मुरमाचे बारीक मोठे खडे तसेच रस्त्याची बारीक खडी असे त्यात टाकून मोठे नुकसान केले आहे. याप्रकरणी दिपक इंदलकर यांनी दौंड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल केला आहे.











