संदीप मापारी पाटील, बुलढाणा
बिबी (ता लोणार), दि 6 : बिबी येथील जवान किशोर काळुसे यांच्यावर गुरुवारी 5 ऑगस्ट रोजी बिबी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात व शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला. तीन वर्षीय मुलगी शेजल व भाऊ नुतन काळुसे यांनी जवान किशोर काळुसे यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिली.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेज वर पाहू शकता
दिनांक 4 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास किशोर काळुसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान 5 ऑगस्ट रोजी अहमदनगर येथील इंडियन आर्मीच्या वाहनाने त्यांचे पार्थिव दुपारी तीन वाजेच्या सुमारास बिबी येथे आणण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गाव स्वच्छ करून महिलांनी पार्थिव जाण्याच्या मार्गावर व स्मशानभूमीत रांगोळी काढली होती.
राहत्या घरून अंत्ययात्रा गावातील मुख्य रस्त्याने निघून नंतर बस स्टँड परिसरातून स्मशानभूमीत पोचली. दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी एकच गर्दी केली होती. किशोर यांच्या पार्थिव ठेवलेल्या रथावर चहुबाजूने पुष्पवर्षाव होत होता. पार्थिव स्मशानभूमीत आल्यानंतर अहमदनगर येथील आर्मीच्या अधीकाऱ्यांनी जवान किशोर काळुसे यांना सलामी दिली.
यावेळी परिसरातील सर्वच पक्षाचे नेते मंडळी तसेच प्रतिष्ठित नागरिक व बिबी येथील तसेच परिसरातील नागरिक व महीलामंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. किशोर यांच्या पार्थिवास अग्नी दिल्यानंतर स्मशानभूमी परिसर शहीद जवान अमर रहे च्या घोषणानी दणाणून गेला होता. आलेल्या सर्व मान्यवरांनी किशोर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र आर्पण करून दर्शन घेतले.
अंत्यविधी परिसर ग्रामपंचायत बिबी व गावातील सर्व तरुण मंडळीनी तसेच माॅ अकॅडमी मांडवा येथील मुलांनी तो परिसर स्वच्छ करून ठेवला होता. बिबी पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ग्रामपंचायतीच्या वतीने मान्यवरांना बसण्याची व्यवस्था केलेली होती. तसेच येथील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून जवान किशोर काळुसे यांना श्रद्धांजली अर्पण केली.











