अॅड. विजय सोनवणे, महान्यूज लाईव्ह
नगर – पोलिसांनी लक्ष देण्यास सुरवात केल्यानंतर आता कर्जत पोलिसांकडे दररोजच खासगी सावकारांच्या वेगवेगळ्या कहाण्या समोर येऊ लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून खासगी सावकारांविरोधात धाडस करून पुढे येणारे लोक मेटाकुटीला आल्यानेही पुढे येत आहेत. अचानक सुरू झालेली ही धाडसाची मोहीम आता नगर जिल्ह्यात प्रभावीपणे राबवली जात आहे. मात्र काल असा एक किस्सा समोर आला की, तो ऐकून कोणीही चक्रावून जाईल.
कर्जत तालुक्यातील या सावकाराचे पोट एवढे मोठ्ठे आहे की, ते काही केल्या भरतच नाही. त्यामुळे एरवीच्या सावकारांकडून आकारले जाणारे ५, १० टक्क्यांच्या व्याजाने त्याला काहीच फरक पडत नव्हता. त्यामुळे त्याने चक्क ४५ टक्के व्याजाचा दर जाहीर केला, ज्या गरजवंतांना याची अक्कल नव्हती, त्यांनी या सावकाराकडून पैसे घेतले,. मात्र मुद्दल काही फिटेचना… नव्हे तो कर्जदार पोलिसांकडे आला नसता, तर कदाचित त्याच्या अख्ख्या आयुष्यात ती मुद्दल फिटली नसती.
कर्जत येथील खासगी सावकार अभि उर्फ बुट्या अनिल पवार याने साठ हजाराचे रोज 900 रु असे व्याज लावले. ६० हजारांचे १ लाख ५१ हजार रुपये दिले, तरी मुद्दल काही हटेचना, अखेर काही आठवड्यांचे व्याज थकताच सावकार बुट्या पवार याने कर्जदाराची गाडीच ओढून नेली.
बुट्या अनिल पवार याच्याकडून कर्जतमधील अण्णाभाऊ साठेनगरमध्ये राहणाऱ्या कर्जदाराने आपल्या मुलीच्या उपचारासाठी आठ महिन्यांपूर्वी ६० हजार रुपये घेतले होते. अर्जंट हवे असल्याने पवार याने त्याला दिवसाला १५० रुपये व्याज पडेल असे सांगितल्यानंतरही त्याने नाईलाज म्हणून ते घेतले.
त्यानंतर प्रत्येक आठवड्याला व्याजापोटी ६ हजार ३०० रक्कमही रोख स्वरूपात हा कर्जदार सावकाराला देत होता. सुमारे ६ महिने व्याजापोटी १ लाख ५१ हजार रुपये दिले. मात्र परिस्थितीमुळे व पैसे न जुळल्याने दोन महिन्याचे व्याज देता आले नाही. मग मात्र आरोपीने प्रत्यक्ष व फोनवर व्याजाच्या पैशांसाठी तगादा लावला.
कर्जदाराने विनंती केली, मात्र ‘रोजाच्या पैशाला मी थांबू शकत नसल्याचे सांगत मला आत्ताच्या आत्ता पैसे हवेत, नाहीतर मी तुला बघून घेईन’ असा दम पवार याने कर्जदाराला दिला. त्यानंतर २ ऑगस्ट रोजी बुट्या पवारने कर्जदाराच्या घरी येऊन पैशांची मागणी केली.
मात्र ‘आत्ता पैसे नाहीत, पैसे आल्यानंतर व्याजासह देईन’ असे त्याला सांगितल्यावर ‘तुझे हे आत्ता नेहमीचेच झाले’ असे म्हणत फिर्यादी वापरत असलेला हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल (एम.एच.१६ व्ही.३२२७) ही जबरदस्तीने घेऊन गेला. त्यावरून नाईलाजाने कर्जदाराने कर्जत पोलिसांचे ठाणे गाठले. पोलिसांनीही या सावकारावर महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ कलम ३९ व इतर कलमाप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल केला.
चंद्रशेखऱ यादव, पोलिस निरीक्षक, कर्जत – दिलेल्या रकमेवर अव्वाच्या-सव्वा मनाप्रमाणे व्याज लावून सावकार सर्वसामान्य, गोरगरीब नागरिकांची आर्थिक, मानसिक पिळवणूक करत असल्याचे निदर्शनास येत आहे. यात अनेक कुटुंबांची फरफट होत आहे. अवैध सावकारकीत सावकारांनी गोरगरीबांच्या, शेतकऱ्यांच्या जमीनीही आपल्या नावावर करून घेतल्या आहेत. मात्र अशा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कर्जत पोलीसांनी पुढाकार घेतला आहे. सावकरांकडून कोणास त्रास असल्यास कर्जत पोलिसांशी संपर्क करावा. सावकारांना घाबरण्याची गरज नाही, तक्रारदाराला मदत केली जाईल .











