टोकयो : तब्बल ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये हॉकी स्पर्धेत भारताने इतिहास घडवला. आजचा दिवस हा भारतासाठी सुवर्णाक्षराने नोंद करण्यासारखाच आहे. 1983 चाली भारताला क्रिकेटमध्ये पहिल्यांदा विश्वचषक मिळाला आणि 1980 नंतर आजपर्यंत हॉकीमध्ये भारताला कधीच काही मिळाले नाही याची खंत होती. ती सर्व खंत बाजूला सारत, हॉकी संघाने भारताला पहिले ऑलिंपिकमधील ब्रॉंझ पदक मिळवून दिले.
हॉकीमधील पदकाचा दुष्काळ संपविण्यात भारतीय पुरुष संघाने यश मिळवले. ब्रॉन्झपदकासाठी झालेल्या सामन्यात भारताने जर्मनीचा ५-४ असा पराभव केला. याआधी १९८० मध्ये मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारताने अखेरचे पदक जिंकले होते. त्यावेळी भारताला सुवर्णपदक मिळाले होते.
आता तब्बल 41 वर्षानंतर भारताने हॉकी मध्ये पदक मिळवून भारताची हॉकी जगात अजूनही श्रेष्ठ असल्याचे निर्विवादपणे सिद्ध केले.
आज ब्रॉंझ पदकासाठी झालेल्या लढतीत जर्मनीने दुसऱ्याच मिनिटाला गोल करून धडाकेबाज सुरूवात केली. पहिला सेटचा खेळ संपला तेव्हा जर्मनीकडे १-० अशी आघाडी होती. या क्वॉर्टरच्या अखेरच्या काही मिनिटांत जर्मनीला अनेक पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण भारताने त्यांना गोल करण्याची संधी दिली नाही.
दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये भारताने सुरुवातीच्या काही मिनिटांत गोल करून १-१ अशी बरोबरी साधली. पण जर्मनीने एकापाठोपाठ एक गोल करून ३-१ अशी मोठी आघाडी घेतली. मात्र पहिला हाफ संपण्याच्या आधी भारताने गोलचा धडाका लावला आणि ३-३ अशी बरोबरी केली.
रुपिंदर पाल सिंहने पेनल्टी स्ट्रोकवर गोल केला आणि भारताला ४-३ अशी आघाडी मिळाली. त्यानंतर सिमरनजीतने भारतासाठी आणखी एक गोल केला. चौथ्या क्वार्टरमध्ये मात्र जर्मनीने गोल केला आणि पुन्हा सार्यांची धडधड वाढली.
भारत ५-४ असा आघाडीवर होता. याच वेळी जर्मनीच्या संघाच्या कर्णधाराला यलो कार्ड देण्यात आले. एक खेळाडू कमी असल्याने जर्मनीवर दबाव आला. जर्मनीने सामन्यात अखेरच्या टप्प्यात गोलरक्षकाला काढून त्याला खेळवले. अगदी सामना संपताना सहा सेकंद बाकी असताना जर्मनीला पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली. पण पीआर श्रीजेशने गोल वाचवला.











