इंदापूर : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका मिळाल्याने आता रुग्णांवर वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 14 व्या वित्त आयोगातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी विशेष प्रयत्नातून नवीन रुग्णवाहिका खरेदी केली आहे. या रुग्णवाहिकेचे बावडा येथे आज अंकिता पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
अंकिता पाटील म्हणाल्या, गरजू गरीब रुग्णांना मोफत रुग्णवाहिका सेवा मिळावी तसेच ʼʼगोल्डन आवर्सʼʼ मध्ये रुग्णांना उपचार मिळावे, याकरिता ही रुग्णवाहिका उपयोगी ठरणार आहे. या मोफत रुग्णवाहिकेचा १०८ नंबरला कॉल करून गरजूनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादा घोगरे, बावडा ग्रामपंचायतचे सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे, ग्रामपंचायत सदस्य दादा कांबळे, गोंदी गावचे सरपंच रणजित वाघमोडे, उपसरपंच अंगद देशमुख, ग्रामविस्तार अधिकारी अंबिका पावसे, नवनाथ नष्टे, भगवान घोगरे, गणेश लंबाते, वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिलकुमार वाघमारे, डॉ. विनोद घोगरे, ग्रामस्थ तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.











