राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : पुणे -सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यातील खडकी परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या सशस्त्र दरोडेखोरांना दौंड पोलिसांनी मध्यरात्री फिल्मी स्टाईलने पाठलाग करून तीन आरोपींना जेरबंद केले. तर उर्वरीत दोन साथीदार अंधाराचा फायदा घेवून पसार होण्यास यशस्वी झाले.
मात्र मध्यरात्री खुद्द दौंड पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी या सशस्त्र दरोडेखोरांचा केलेला पाठलाग आणि तीन आरोपींना केले अटक या कामगिरीबद्दल ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. दरम्यान, या आरोपींना सोमवारी ( दि.2 ) दौंड न्यायालयात हजर केले असता त्यांना दौंड न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
गौरव भारत कुदळे (रा. भोईर नगर, आकुर्डी, पिंपरी चिंचवड), लहू उर्फ लाल्या अंकुश भिसे (रा. पिंपरी चिंचवड), महेश बाबुराव पाटील (रा. दत्तनगर, थेरगाव, पिंपरी चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे- सोलापूर महामार्गालगत खडकी हद्दीत शितोळे वस्तीजवळ पुलाजवळ काही अज्ञात इसम सशस्त्र हत्यारासहीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना मिळाली.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पवार यांनी क्षणाचा विलंब न करता तात्काळ पोलीस कर्मचारांची पथक तयार करून स्वतः घटनास्थळी धाव घेतली. रविवारी मध्यरात्री दौंड पोलीसांच्या या पथकाने माहिती मिळाल्याने ठिकाण्य़ावरून या दरोडोखोरांचा शोधमोहीम सुरू केली.
पोलीसांना पाहून दबा धरून बसलेल्या या आरोपींनी पळ काढला, मात्र पोलीसांनी अंधारातच पाठलाग सुरू केला. चोर पोलीसांचा हा पाठलाग तेव्हाच थांबला जेंव्हा हे चोर पोलीसांनी पकडले.
पोलीसांनी पाच पैकी तीन जणांना पकडले तर उर्वरीत दोन जण अंधाराचा फायदा घेवून पसार झाले आहेत. याप्रकरणी पोलीसांनी तीन दुचाक्या, तीन सत्तुर, एक गुप्ती, एक मिरची पुड पाकीट, ग्रिफ वायर, पक्कड असे दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे.
पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहाय्यक फौजदार मच्छिंद्र भगत, पोलीस हवालदार पांडुरंग थोरात, गोरख मलगुंडे, महेश भोसले, अमोल गवळी, सतीश हिरवे,शैलेश हंडाळ, अमोल देवकाते तसेच स्थानिक पोलीस मित्र ज्ञानेश्वर शितोळे, जहांगीर शेख, गोरख शितोळे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.
दरम्यान, दौंड पोलीसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून तातडीने घटनास्थळी धाव घेत या दरोडेखोरांना जेरबंद केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पोलीसांच्या या कामगिरीची खडकी परिसरातील नागरीकांनी समाधान व्यक्त करीत कौतुक केले आहे.











