मुंबई : महान्यूज लाईव्ह
स्वप्निल लोणकर यांच्या आत्महत्येनंतर खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने तातडीने एमपीएससी च्या जागा भरण्याचे निर्णय घेतले, मात्र राज्य सरकारवर सतत शरसंधान साधणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टिका केली आहे. अजित पवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगावरील सदस्यांची रिक्त पदे 31 जुलैपर्यंत भरणार असल्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार त्यांच्या नावाची शिफारस करणारी यादी राज्यपाल भवनात पाठवली देखील, मात्र राज्यपालांनी अद्याप त्यावर स्वाक्षरी केलेली नसल्याचे समजते. त्यावरून आता राज्यभरातील तरुणाईमध्ये या राजकारणाची चर्चा सुरू झाली आहे.
त्यामुळे बारा आमदारांनंतर एमपीएससीच्या सदस्यांची देखील यादी राज्यपालांनी अडवली की काय? अशी चर्चा सुरू असून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र यावर टीका केली आहे. कालच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल हे राजभवन हे भाजपचे कार्यालय बनले असून राज्यपाल हे भाजपच्या कार्यकर्त्यांप्रमाणे वागतात अशी टीका केली होती.
त्यानंतर आता हा दुसरा प्रकार समोर आला असून आयोगाच्या रिक्त जागा 31 जुलैपर्यंत भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्यात झालेल्या बैठकीनंतर केली होती. त्यानंतर लोकसेवा आयोगाच्या चार सदस्यांची नावे देखील निश्चित केली होती. यामध्ये पोलीस अधिकारी प्रताप दिघावकर यांच्यासह सेवानिवृत्त सनदी अधिकारी राजीव जाधव यांचा देखील समावेश असल्याचे समजते.
मात्र या नावांची यादी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे शुक्रवारी पाठविण्यात आल्यानंतर अद्याप त्यावर स्वाक्षरी झालेली नाही. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या सोशल मीडियाने देखील राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर टीका केली आहे. राज्यातील सर्व युवकांची मागणी असतानाच हे राजकारण होणार असेल तर मात्र, ते महाराष्ट्रासाठी घातक ठरणार आहे अशी टीका केली जात आहे.
राष्ट्रवादी सोशल मीडियाचे कार्यकर्ते व बाबुर्डी गावचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी ट्विट करत या संदर्भात अजित दादांनी शब्द पाळला, आता राज्यपालांचे काय असा प्रश्न विचारला आहे.











