प्रशासनाची डोकेदुखी वाढली
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरात काल नव्याने एक कोरोना बाधीत रूग्ण सापडला असताना आज पुन्हा कोरोना बाधीत रूग्णाच्या संपर्कात असलेल्या आणखी एकास कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले.
शहरातील गोवा गल्ली येथील ज्येष्ठ व्यक्तीचा कोरोनामुळे नुकताच मृत्यू झाला, त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या मुलास कोरोनाची लागण झाल्याचे काल निष्पन्न झाले. या मुलाच्या संपर्कातील २५ जणांची कोरोना विषाणूची चाचणी प्रशासनाने केली होती. आज (ता. २९) त्यांचे वैद्यकीय अहवाल आले, त्यामधील २४ जणांचे अहवाल निगेटिव्ह असून एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
दौंड शहरातील कोरोनाचे संकट संपत नसल्याचे चित्र असून परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. यामुळे प्रशासनापुढे अनेक प्रश्न उभे राहीले आहेत. दरम्यान दौंड शहरात कोरोना बाधीत रूग्णांची संख्या ७ वर पोचली असून यापैकी तीन जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकाचा मृत्यू झाला आहे, तर सध्या तीन रूग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाचे संकट वाढत असताना दौंडकर मात्र यास गांभीर्याने घेत नसून शहरात बिनधास्त वावरत आहेत. याबाबत दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सोशल मिडीयावर नाराजी व्यक्त केली आहे.










