आषाढ शुध्द दशमीला हेलिकॉप्टरने पादुका थेट पंढरपूरला नेणार
पुणे : महान्यूज लाईव्ह
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी पालख्या निघतील, मात्र दिंडी सोहळा निघणार नाही, तो रद्द करण्यात आला असून त्याऐवजी पादुका मात्र वाहनाने किंवा हेलिकॉप्टरने पंढरपूरला जातील यावर पालखी सोहळाप्रमुख, मानकरी आणि राज्य सरकारचे एकमत झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिकतेतील हा ऐतिहासिक निर्णय आज पुण्यात झाला.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पालखी सोहळाप्रमुख, विश्वस्त व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक कौन्सिल हॉलमध्ये पार पडली. यामध्ये जून महिन्यात नियमित निघणाऱ्या पालखी सोहळ्याची कोरोनाच्या काळातील स्थिती काय ठेवायची यावर चर्चा झाली. यामध्ये सरकारचा निर्णय मान्य असेल असे सर्वच पालखीप्रमुखांनी स्पष्ट केले. यामध्ये निवडक वारकऱ्यांसमवेत पालखी सोहळा नेण्याबाबतची चर्चा झाली. यामध्ये वारकऱ्यांच्या संख्येवरही चर्चा झाली. आषाढ शुध्द दशमीला केवळ पादुका हेलिकॉप्टर किंवा वाहनाने थेट पंढरपूरला नेण्याबाबत मात्र सर्वांचे एकमत झाले. याबाबतची अधिसूचना व एकत्रित निर्णय थोड्या कालावधीतच जाहीर होईल.











