जबरी चोरी करणारे अट्टल गुन्हेगार जेरबंद करताना थरार..
2 पुरुष एका महिलेला अटक, कर्जत पोलिसांची मोठी कारवाई! 1 लाख 62 हजार 70 रुपयांचा माल जप्त..!
एड. विजय सोनवणे : महान्यूज लाईव्ह
26 जुलै रोजीची दुपार.. तीन वाजलेले.. सितपूर (ता. कर्जत) येथील रामचंद्र गायकवाड यांच्या घरात चोरी झाल्याची माहिती पोलिसांना मिळते आणि पोलीस तात्काळ तिकडे रवाना होतात..
तेव्हा कळते की, दरोडा जबरी झालेला आहे.. मारहाण झालेली आहे.. लाखो रुपये चोरलेले आहेत आणि मग सुरु होतो चोरट्यांना शोधण्याचा थरार.. ग्रामस्थांना सोबत घेऊन पोलिसांचा सुरू होतो चोरट्यांचा पाठलाग.. तब्बल 41 किलोमीटरचा प्रवास करत चोरटे पोलिसांच्या हाती लागतात आणि सव्वा दोन लाखाच्या ऐवजापैकी 1 लाख 67 हजारांचा ऐवज जाग्यावरच हस्तगत केला जातो…!
या घटनेची हकीकत अशी 26 जुलै रोजी दुपारी 67 वर्षाचे रामचंद्र बाबासाहेब गायकवाड घरात झोपलेले असताना अचानक त्यांच्या कपाटाचा आवाज आला. त्यामुळे त्यांना जाग आली आणि त्यांना समोर घरात चोरटे दिसले.
त्यांनी आरडाओरडा करताच चोरट्यांनी लोखंडी टॉमीने त्यांना जबरदस्त मारहाण केली आणि त्यांच्या खिशातील व घरातील सोन्याचे दागिने आणि पैसे असा दोन लाख 20 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी जबरदस्तीने काढून घेतला होता. त्यानंतर त्यांनी व शेजारच्या लोकांनी पोलिसांना कळवले होते.
पोलीस वेळेच पोचले असल्यामुळे त्यांच्या लक्षात आले की चोरटे फार दूर गेले नसतील आणि तिथून सुरू झाला तो चोरट्यांना पकडण्याचा प्रवास! आरोपी हे नागलवाडीच्या दिशेने पळालेले आहेत अशी माहिती मिळाल्यावर तात्काळ कर्जत पोलिस व गावकऱ्यांनी समोरच्या लोकांना फोन केले.
हा पाठलाग करत असताना तीन आरोपींपैकी एक आरोपी ढेबऱ्या उर्फ रामेश्वर राम चव्हाण (वय २५ वर्ष राहणार ब्रह्मगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड) हा मिळून आला. त्याला पकडून विचारपूस केली असता त्याने योग्य ती माहिती दिली नाही. त्यानंतर कर्जत पोलिसांनी तात्काळ नागलवाडी मधून ज्या दिशेने वेगवेगळे रस्ते जातात, त्या दिशेला पोलीस अधिकारी व पथकांना रवाना केले.
पुन्हा पाठलाग सुरू झाला. माहिती घेत घेत शेवटी पोलिसांनी आष्टी येथे रामेश्वर जंगल्या भोसले, (वय 25 वर्ष) व धला उर्फ मोहिनी रामेश्वर भोसले (वय 22 वर्ष, दोन्ही राहणार आष्टी, जिल्हा बीड) यांना ताब्यात घेतले. त्यांची सखोल विचारपूस केली व अंगझडती घेतली असता चोरी गेलेला काही माल त्यांच्याकडे मिळून आला.
वरील नमूद तिन्ही आरोपींना अटक करून विचारपूस केली असता आरोपी ढेबऱ्या चव्हाण, (45 वर्ष, रा. ब्राम्हगाव, ता. आष्टी), रामेश्वर भोसले, (26 वर्ष, रा. आष्टी) व कुकड्या उर्फ प्रफुल्ल भोसले, (राहणार पिंपरखेड, तालुका आष्टी, जिल्हा बीड) यांनी चोरी केल्याचे कबूल केले.
दरम्यान ढेबऱ्या व रामेश्वर यांच्यासह महिला आरोपी धला उर्फ मोहिनी भोसले हिला य गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची होंडा शाईन मोटर सायकल (एम एच 23, बी. 1952), सॅमसंग कंपनीचा मोबाइल, सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा 1 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यातील अटक आरोपींवर यापूर्वीचे घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न असे 4 गुन्हे दाखल आहेत. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक निरीक्षक सुरेश माने, फौजदार अमरजीत मोरे, किरण साळुंके, हवालदार प्रबोध हंचे, बबन दहिफळे, शाम जाधव, रवी वाघ सुनील खैरे, महादेव कोहक, संतोष फुंदे, गोवर्धन कदम, गणेश काळाने, बळीराम काकडे, राणी व्यवहारे, रिंकी माढेकर यांच्या पथकाने केली.
चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, कर्जत पोलीस स्टेशन – ग्रामस्थांनी अशा संकटवेळी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर करावा, 18002703600 या क्रमांकावर कॉल करावा. गावातील नागरिकांना आणि ज्या दिशेने चोरटे पळाले आहेत, त्या गावचे नाव घेऊन कॉल करावा. चोरटे मुद्देमालासह मिळून येतील. फक्त आरोपी मिळून आल्यावर त्यांना मारहाण करू नये.











