लोणी काळभोर : महान्यूज लाईव्ह
भाजपचा नेता व जिल्हा परिषदेचा माजी सभापती मंगलदास बांदल याच्यासह संदीप भोंडवे, त्याचा भाऊ विकास भोंडवे, सचिन पलांडे आणि शिवाजीराव भोसले बँकेच्या एका अधिकाऱ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
लोणीकंद पोलिस ठाण्यात या संदर्भात गंगाराम मासाळकर यांनी तक्रार दिली होती. या नव्या गुन्ह्यामुळे मंगलदास बांदल याच्या अडचणीत वाढ झाली असून भोंडवे याचे समाजकारणाच्या नावाखाली चाललेले वसुली साम्राज्य खालसा करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी सुरुवात केली.
संदीप भोंडवे आणि त्याचा भाऊ विकास भोंडवे याला आज पोलीस निरीक्षक गणेश मोरे यांनी अटक केली. दरम्यान या दोघांना अटक केली असून सचिन पलांडे आणि शिवाजीराव भोसले बँकेतील एक अधिकारी मात्र फरार आहे. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पथके तैनात केले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
मासाळकर यांची साडेनऊ एकर जमिन शिवाजीराव भोसले बँकेत गहाण ठेवून, त्यावर कर्ज काढण्यासाठी बांदल, भोंडवे आणि सचिन पालांडे या तिघांनी सन 2013 मध्ये मासाळकर यांचे अपहरण करून जबरदस्तीने गहाणखत करून घेतले होते. त्यानंतर तो बोजा काढण्यासाठी मासाळकर यांच्याकडेच एक कोटी रुपयांची मागणी केली होती. यासंदर्भात खंडणी अपहरणाचा गुन्हा मासाळकर यांनी दाखल केला त्यावरून भोंडवे आणि त्याचा भाऊ या दोघांना पोलिसांनी अटक केली.











