खंडाळा : महान्यूज लाईव्ह
माणुसकी आणि संवेदनशीलता यांना मान खाली घालायला लावणारी घटना फलटण तालुक्यातील एका गावात बुधवारी घडली. भेळ खायला देण्याचे आमिष दाखवून ४ आणि ७ वर्षाच्या चिमुरड्या मुलींवर एका नराधमाने अत्या-चार केला. पोलिसांनी या नराधमास अटक केली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धनंजय बाजीराव गायकवाड (रा. झिरपवाडी) यास अटक केली आहे. यासंदर्भात पीडित बालिकांच्या वडिलांनी फलटण शहर पोलिसांकडे फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या नराधमाने बुधवारी दुपारच्या वेळी दोन्ही बालिकांना भेळ खाण्याच्या आमिषाने त्याच्या घरी नेले आणि त्यांच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. तसेच त्याबद्दल कोणाला काही सांगायचं नाही असा दम दिला.
या पीडित मुलींनी आपल्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यावरून पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली. पोलिसांनी तातडीने गांभीर्य लक्षात घेऊन कलम 376(2) (आय), 506, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 व 6 कलमाखाली गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली.
पुढील तपास पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भारत किंद्रे, सह तपासी अधिकारी स्वाती धोंगडे करीत आहेत.











