दौलतराव पिसाळ: महान्यूज लाईव्ह
वाईच्या पश्चिम भागातील जोर या गावावर ऐन बेंदुर या सणाच्या दिवशी (दि.२२) दिवसरात्र मुसळधार पाऊस पडत असताना डोंगरावरुन दरड आणि माती कोसळताना अनिता पांडुरंग सपकाळ यांनी पाहिले आणि आरडाओरडा करत वस्तीतून जवळपास ३० माणसं घराबाहेर काढण्यास यश मिळवले, काळाला चकवा देत माणसं वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या अनिता मात्र मातीच्या लोंढ्यात वाहून गेल्या.
त्या वाहुन जात असतानाच सचिन पांडुरंग सपकाळ (वय १७) या त्यांच्या मुलाने पाहिले आणी त्याने क्षणाचाही विचार न करता आईला वाचविण्या साठी त्या मातीच्या लाटेत उडी टाकली पण नियतीला हे मान्य नसल्यानेच काळाने या आई आणि मुलावर झडप घातली. ही मायलेकरं
क्षणार्धात मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली.
पती पांडुरंग सपकाळ यांनी ग्रामस्थांच्या मदतीने आपल्या पत्नीचा आणि मुलाचा शोध सुरु केला, पण दुर्दैवाने त्यांना आजपर्यंत यश आले नाही. जिल्हा प्रशासन, वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूरकर आणि तहसीलदार रणजित भोसले यांनी या मायलेकरांचा गतीने शोध घेण्यासाठी पुण्यातुन एनडीआरफची टिम मागवली होती.
पण जोर गावाकडे जाणारे पूल वाहुन गेल्याने त्या गावापर्यंत या टिमला मुसळधार पावसामुळे जलद
पोहचणे अवघड झाले. दुसऱ्या दिवशी ही टिम प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूर यांना सोबत घेऊन जोर गावातील भर पावसात घटनास्थळावर दाखल झाली. शोध मोहीम सुरू झाली पण दोन्ही मायलेकरे हाती लागले नाहीत.
वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूर यांनी मात्र हार न मानता हे मृतदेह शोधून
काढण्यासाठी आज (दि.२९ जुलै) आणखी २४ जवानांची एक टिम मागवून पुन्हा शोध मोहीम सुरू केली आहे. गावातील तीस जणांचा जीव वाचवणाऱ्या त्या देवदूत महिलेचा शोध लागायला हवा, ही त्या गावासह संपूर्ण तालुक्यातील नागरिकांची इच्छा आहे. अजूनही ही मायलेकरे जिवंत असावीत, यासाठी गावागावात लोक प्रार्थना देखील करत आहेत. अशावेळी प्रांताधिकारी यांनी कंबर कसल्याने त्यांच्या मिळून येण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.











