खंडाळा : महान्यूज लाईव्ह
राज्यभर तलाठ्यांच्या कार्यालयातील झिरो भाऊसाहेब हे प्रकरण गाजते आहे, तर तलाठ्यांच्या आशिर्वादाने झिरो भाऊसाहेबांची मग्रुरी वाढत आहे आणि हेच भाऊसाहेब तलाठ्यांसाठी पैसे गोळा करत असतात, हे देखील तेवढेच उघड गुपित आहे. आज कराडमध्ये तलाठ्याच्या हाताखालील सुनील श्रीधर पाटील याने जमिनीच्या उताऱ्यावरील बँकेचा बोजा कमी करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितली आणि तडजोडीअंती आठ हजार रुपये लाच घेताना साताऱ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहाथ पकडले.
सुनील श्रीधर पाटील (रा. बुधवार पेठ कराड तालुका कराड जिल्हा पुणे) असे याचे नाव असून हा पाटील नगरपरिषदेच्या इमारतीत असलेल्या तलाठी कार्यालयात तरड यांच्या हाताखाली काम करतो. तक्रारदाराच्या वडिलांच्या नावाने कराड शहरांमध्ये असलेल्या इमारतीच्या सातबारा उताऱ्यावर कराड अर्बन बँकेचा बोजा होता, तो बोजा कमी करून तक्रारदाराच्या पत्नीच्या नावाने ही इमारत करून त्यावर बोझा चढवायचा होता.
त्यासाठी बेकायदेशीर मार्ग व आपल्या वैयक्तिक प्रभावाचा वापर करून पाटील याने हे काम करून देण्यास तयारी दर्शवली, मात्र त्यासाठी दहा हजार रुपयांची लाचेची मागणी केली तडजोडी अंती ८ हजार रुपये लाच घेताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के, श्री राजे, श्री काटकर, श्री भोसले यांच्या पथकाने पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे व अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांनी या कारवाईत मार्गदर्शन केले.











