माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर – भोर तालुक्यात पावसाने हाहाकार माजविल्याने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले असून मुसळधार पावसामुळे वरंधा घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्याने भोर – महाड या मार्गावर लांबच लांब वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान वरंधा घाट काही पुढील काही दिवस वाहतूकीसाठी बंद राहणार आहे. शेतीचे नुकसानस्थळी दस्तुरखुद्द तहसीलदार अजित पाटील यांनी धाव घेत स्वतः उपाययोजना करण्यात मदत केली.
भोर – महाड रस्त्यावरील हिर्डोशी, वारवंड व शिरगाव, कारुगंण, वब कुंडली, कंकवाडी या रिंगरोडवर दरडी कोसळून रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. यामध्ये महाड – भोर एसटी अडकली होती. एसटीमध्ये गंभीर रुग्ण आजारी असल्यामुळे वारवंडच्या सेल्फी पाँईटवर दरड बांधकाम विभागाने तात्काळ बाजूला करुन पुन्हा एसटी महाडकडे पाठवण्यात आली. दरम्यान पाच जेसीबीच्या सहाय्याने दरडी हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असून लवकरच रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यात येईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सदानंद हल्लाळे यांनी माहिती दिली.
भोर तालुक्यात गुरुवारी मध्यराञीच्या सुमारास मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यात जाणाऱ्या रस्त्यावर दरडी कोसळून संपूर्ण वाहतूक बंद झाली. पश्चिम – दक्षिण भागात पाणीच पाणी होऊन रस्ते, शेती, पुल पाण्याखाली गेले होते. यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
धानवली, कारी, कंकवाडी, रायरी, गुढे, निवंगण यासह अनेक डोंगराखालील तसेच ओढे, नदी, नाले याला पूर आले. पावसाने दरडी पडुन पाणी खाचरात जाऊन लागवड केलेली भात खाचरे गाळाने भरली. ताली पडुन खाचरे गाडली गेली. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तर दक्षिण भागातील पूल पाण्याखाली गेले असल्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. तर भात शेतीचे नुकसान होऊन कडधान्ये पिके पाण्याखाली गेली आहेत.
आंबवडे गावाजवळचा दगडी पुल वाहुन गेल्याने आंबवडे खोऱ्यातील वाहतुक बंद असून पान्हवळ ते घोरपडेवाडी पुल वाहुन गेला आहे. दरड पडल्यामुळे साळुंगण येथील स्मशानभुमी दगड मातीत गाडीली आहे. पोल्ट्रीतील पक्षी भरताना वीजेचा धक्का लागून मोहन अमृता घोरपडे याचा मृत्यू झाला आहे. सांगवी भिडे येथील पुल पाण्याखाली गेला आहे. निरा नदीच्या पाण्याची पाणी पातळी अचानक वाढल्याने भोर शहरातील पदमावती वस्तीत पाणी शिरले आहे. यामुळे भोर आणि महाड शहराचा संपर्क तुटलेला आहे.
मुसळदार पावसामुळे डोंगराच्या दरडी कोसळल्या आहेत. यामुळे धोकादायक ठिकाणी असणाऱ्या गावामधील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असल्याचे प्रांतधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी सांगितले. तर शेतकऱ्याचे मुसळदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले असून याबाबत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देणार असल्याचे तहसिलदार अजित पाटील यांनी सांगितले.











