बनावट नोटीफिकेशन्स का फिरवताहेत अज्ञात लोक?
मुंबई : महान्यूज लाईव्ह
सम विषम प्रमाणे रस्त्याच्या एका बाजूची दुकाने व दुसऱ्या बाजूची दुकाने एकाआड एक दिवस सुरू ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारच्या नावाने एक नवे नोटीफिकेशन सोशल मिडियात व्हायरल झाले, त्यास तातडीने राज्य सरकारने ट्विट करून हे नोटीफिकेशन बनावट असल्याचे स्पष्ट करीत त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.
मागील तीन चार वर्षात राज्य सरकारचे निर्णय अधिकृत जीआर येण्यापूर्वीच सोशल मिडियात व्हायरल व्हायचे. तसाच काहीसा प्रकार आता झाल्याने राज्य सरकार सावध झाले आहे. किंबहूना मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या नावाने एक नोटीफीकेशन सध्या समाजमाध्यमात फिरत आहे, त्यामध्ये २९ मे नंतर रस्त्याच्या एका बाजूची दुकाने एका दिवशी तर दुसऱ्या बाजूची दुकाने दुसऱ्या दिवशी सुरू राहतील. ती दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ याच वेळेत सुरू राहतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे त्यांचा फॉर्म्युला देखील त्यामध्ये स्कीम १ व स्कीम २ या नावाने देण्यात आला आहे. यामध्ये लोकांनी शक्यतो मार्केट प्लेसच्या ठिकाणी फिरणे टाळावे व होम डिलीव्हरी प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन यामध्ये करण्यात आले आहे.
मात्र हे नोटीफीकेशन समाजमाध्यमात व्हायरल होताच राज्य सरकारच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून या नोटीफिकेशनचा राज्य सरकारचा संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.











