महाराष्ट्रात अवघ्या १५-१५ दिवसांत होताहेत १-१ हजार बेडचे कोरोना हॉस्पिटल
मुंबई : महान्यूज लाईव्ह
चीनचं काय कौतुक करता? महाराष्ट्र सरकारने एमएमआरडीए मैदानावर देशातील पहिले कोरोना केअर सेंटर केवळ १५ दिवसांत उभारले. १००८ खाटांची क्षमता, ऑक्सिजनची सुविधा असलेले ५०४ बेडचे हे सेंटर उभारल्यानंतर आता ठाण्यातील बाळकुम येथेही १ हजार बेडचे कोविड केअर सेंटर उभारली जात आहेत.
महाराष्ट्र सरकारने कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत अगदी १ लाख खाटांची व्यवस्था सुरू केलीआहे. गोरेगाव येथील नेस्को मैदानावर १ हजार २४० खाटांची क्षमता असणारी कोविड केअर सेंटर २ उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. इथेही ऑक्सिजन आणि मोबाईल आयसीयू युनिट असणार आहेत.
एमएमआरडीए मैदानावर देशातील पहिले कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले. सव्वा लाख चौरस फूटाचे क्षेत्रफळ असलेल्या या सेंटरमध्ये पॅथॉलॉजी, ईसीजी, एक्स रे मशीनसह सर्व प्रकारची सुविधा देण्यात आली आहे. एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए. राजीव यांच्या मार्गदर्शनाखाली युध्दपातळीवर हे कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले.
दरम्यान ठाण्यातील बाळकुम येथे युध्दपातळीवर उभारण्यात येत असलेल्या कोविड सेंटरमध्ये १ हजार बेड्स, ५०० ऑक्सिजन व ५०० नॉन ऑक्सिजन ची क्षमता तर ८० आयसीयू बेड्सची सुविधा उपलब्ध असणार आहे. येत्या ७ ते ८ दिवसांत येथील कोविड सेंटरही जनतेच्या सेवेत रुजू होईल अशी माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.










